
भ्रष्ट निवडणूक आयोगाविरुद्ध संपूर्ण देशाने रण पुकारले असून इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली आज अवघ्या देशाने उठाव केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयावर धडक मोर्चा काढला. ‘वोट चोर, गद्दी छोड’, ‘इन्कलाब झिंदाबाद’ अशा घोषणा देत हजारो देशवासीय मोर्चात सहभागी झाले. या विराट मोर्चाने मोदी-शहांच्या सत्ता सिंहासनाला जोरदार हादरे दिले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने सर्वोच्च न्यायालयात जाऊन मतचोरीविरुद्ध जनहित याचिका दाखल केली. राहुल यांच्यासह इंडिया आघाडीच्या 11 नेत्यांनी याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या असून निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह अन्य दोन आयुक्तांनाही यात प्रतिवादी करण्यात आले आहे.
पक्षपाती आणि मनमानी ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून देशात आंदोलनाचा वणवा भडकला आहे. मुंबई, चेन्नई, कोलकात्यापासून दिल्लीपर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलने सुरू आहेत. पोलिसांच्या बळावर ही आंदोलने दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या दडपशाहीविरोधात इंडिया आघाडीने आज सर्वोच्च न्यायालयावर धडक दिली. कॅनॉट प्लेस परिसरातील बाराखंबा रोड जंक्शनवरून मोर्चाला सुरुवात झाली. इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते मोर्चात सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रस्त्यावर उतरत असलेल्या ‘आयसा’च्या अध्यक्षा नेहा बोरा, प्रियांका गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात आघाडीवर होत्या. हजारो तरुण, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि राजकीय कार्यकर्त्यांचा जनसागर दिल्लीच्या रस्त्यांवर उतरला. मोदी सरकार आणि ज्ञानेश कुमार विरोधी घोषणांनी अवघी दिल्ली दणाणून गेली.
सायंकाळी सहाच्या सुमारास मोर्चा सर्वोच्च न्यायालयाजवळ पोहोचला. मोर्चाने जाऊन सरन्यायाधीश सूर्य कांत यांना भेटण्याचे नियोजन होते. मात्र सूर्य कांत यांनी शिष्टमंडळाला भेट नाकारत याचिकेद्वारे म्हणणे मांडा, असे सुचवले होते. त्यानुसार राहुल यांच्यासह नेत्यांचे शिष्टमंडळ न्यायालयात गेले. तिथे इंडिया आघाडीच्या लिगल टीमने जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
याचिकेवर कोणाची स्वाक्षरी?
याचिकेवर राहुल यांच्यासह राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुगता रॉय, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाकपचे डी. राजा, झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार महुआ मांझी, माकपचे सरचिटणीस एम.ए. बेबी आणि मुस्लिम लीगचे ई. टी. मोहम्मद बशीर यांच्या सह्या आहेत
विरोधकांचे म्हणणे काय?
- देशात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेला अंतरिम स्थगिती द्या.
- एसआयआरशी संबंधित सर्व फाइल्स, बैठकांचे अजेंडे, मिनट्स, नोंदी आणि हरकती जाहीर करा.
- मतदार यादीतून नाव वगळताना रीतसर नोटीस द्या व मतदारांचे म्हणणे ऐकून घ्या.
- मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांची बूथनिहाय माहिती जाहीर करा. त्यांना वगळण्याची कारणेही नमूद करा.
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या.
- शांततापूर्ण आंदोलनांवर निर्बंध लादण्याच्या सरकारच्या भूमिकेची दखल घ्या.
हे लोकशाही वाचवण्यासाठी शिवतांडव आहे. यात कोणीही सहभागी होऊ शकतो. तांडव करण्यासाठी प्लानिंगची गरज नसते. आज सर्वोच्च न्यायालयावर गेलो. उद्या आणखी काही तरी करू. हे तांडव सुरूच राहील! – राहुल गांधी



























































