
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीने शिवसेनेवर डॉक्टरेट केलेल्या पाच ‘पीएचडी’धारक मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार असून शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात येईल.
संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील अग्रणी थोर समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन केलेली शिवसेना आणि त्यांनीच सुरू केलेले ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक ‘सामना’ यावर विविध विद्यापीठांना प्रबंध सादर करून पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या पाच डॉक्टरांचा सन्मान करण्यात येऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांच्या पुढाकाराने शिवसेना अपंग सहाय्य सेनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात शिवसेना नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी, शिवसेनेच्या अकोला महिला संघटक डॉ. सरिता वाकोडे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, दैनिक ‘सामना’चे प्रतिनिधी डॉ. अनंत गुरव आणि अमरावती येथील डॉ. मनीष देशमुख यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

























































