
पनवेलच्या खांदा येथून बेपत्ता झालेल्या एका ११ वर्षीय बालकाचा नेरळ पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोध घेतला आहे. डायल ११२ वर कॉलद्वारे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ वेगाने हालचाली सुरू केल्या. पोलीस पथकाने तातडीने तीन स्वतंत्र टीम तयार करून शोधमोहीम राबवल्यानंतर राजेंद्र गुरुनगर परिसरात मुलगा सुखरूप आढळला.
नेरळ येथील खांदा येथून मेहरुनमिसा उस्मान शेख यांनी रात्री ९ वाजता ११२ नंबर डायल करून संपर्क साधत आपला मुलगा मोहम्मद इम्रान हा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नेरळ पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता शोधकार्य सुरू केले. बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथकांमध्ये विभागणी केली. एक पथक रेल्वे ट्रॅक, दुसऱ्या पथकाने बाजारपेठेत तर तिसऱ्या पथकाने घराच्या आसपासच्या भागात शोध घेतला. परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू असतानाच मुलगा जुन्या घराजवळ दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजेंद्र गुरुनगर परिसरात तपास केला असता रात्री ९ वाजेच्या सुमारास मोहम्मद इम्रान हा सोसायटीच्या आवारात अंधारात सापडला.

























































