हैदराबादमध्ये भयंकर प्रकार! किरकोळ वादानंतर पत्नीच्या जीवावर उठला पती, मुलांसमोरच चिरला गळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील हैदराबाद शहरात एका पतीने आपल्या तीन निष्पाप मुलांसमोरच धारदार चाकूने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भयंकर कृत्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अजमेरा बेगम (वय ३२) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी पतीची ओळख मोहम्मद मुस्तफा अशी पटली आहे. ही घटना बालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहाडी शरीफ भागातील न्यू बाबा नगर येथे घडली.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी अजमेरा बेगम आणि तिचा पती मोहम्मद मुस्तफा यांच्यात किरकोळ कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात मुस्तफाने धारदार चाकू काढून थेट पत्नीच्या गळ्यावर वार केले. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वेळी ही रक्तरंजित घटना घडली, त्या वेळी दाम्पत्याची तिन्ही लहान मुले तिथेच उपस्थित होती. आपल्या डोळ्यांसमोरच वडिलांनी आईवर केलेला हा प्राणघातक हल्ला पाहून मुले प्रचंड दहशतीखाली आली आहेत.

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. ‘क्लूज टीम’च्या (Clues Team) साहाय्याने पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया जनरल रुग्णालयाच्या शवगृहात पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपी मोहम्मद मुस्तफाला पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, या दाम्पत्यामध्ये नेहमी घरगुती वाद होत असत. मात्र, हत्येमागील नेमके कारण काय होते आणि त्या दिवशी नेमका कोणत्या विषयावरून वाद झाला होता, याचा तपास पोलीस करत आहेत