अटारी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ घुसखोरीचा प्रयत्न, पाकिस्तानी नागरिक बीएसएफच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अटारी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हिंदुस्थानी हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ताब्यात घेतले आहे. बीएसएफने या व्यक्तीला थांबण्याच्या सूचना दिल्या. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष करत या व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला. यानंतर बीएसएफने त्याला ताब्यात घेतले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बॉर्डर आउटपोस्ट’ (BOP) पुलमोरान कंजरी येथील कुंपणाजवळ तारेच्या कुंपणाजवळ कर्तव्यावर असताना बीएसएफच्या 100व्या बटालियनच्या जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या. एक पाकिस्तानी नागरिक तारेच्या कुंपणातून हिंदुस्थानात घुसखोरीचा प्रयत्न करत होता. बीएसएफच्या जवानांनी त्याला थांबण्याचा सूचना केल्या. मात्र त्याने दुर्लक्ष केले. अखेर जवानांनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे पंजाब सीमेवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मोहम्मद अवैस असे ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानी नागरिकाचे नाव आहे. तो पाकिस्तानमधील फैसलाबाद जिल्ह्यातील मुंडा पिंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाथ गावाचा रहिवासी आहे. घटनेनंतर BSF चे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्या व्यक्तीला घरींदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस कथित घुसखोरी आणि त्यामागाचा हेतू जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी करत आहेत.