Raigad News – खोपोलीत कस्तुरी लॉजिस्टिक्स वेअर हाऊसचा लोखंडी शेड कोसळला; एकाचा मृत्यू, 25 कामगार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खालापूर तालुक्यातील माणकिवली येथे मंगळवारी कस्तुरी लॉजिस्टिक्सच्या वेअर हाऊसचे लोखंडी शेड कोसळले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 25 कामगार जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. शेडखाली क्रेन, डंपर, रोलर यांचेही मोठे नुकसान झाल आहे. जखमींना खोपोलीतील खोपोली नगरपालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठ जणांची प्रकृती गंभीर झाल्याने जाखोटीया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुभाष निरंजन यादव असे मयत कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर तालुक्यातील माणकिवली गावाजवळ अंदाजे 40 एकरात कस्तुरी लॉजिस्टिक्स वेअर हाऊसचा मेटल लोखंडी शेडचा काम गौरव इंजिनिअर (पुणे) हे करीत आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजता लोखंडी शेडवरती जवळपास 25 कामगार शेड फिटिंगचे काम करत होते. तर शेडखाली 30 ते 40 कामगार होते. लोखंडी शेड अचानक पत्यासारखी कोसळल्याने शेडवरील कामगार अडकले तर शेडखाली काम करणारे कामगार बाहेर पडल्याने वाचले आहेत.

शेडखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य राबवत खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात नेण्यात आले. सुभाष यादव या कामगाराच्या डोक्यावर आणि मानेवर लोखंड पडून गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांचे हातपाय फॅक्चर झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. स्ट्रक्चर कोसळण्यामागील नेमके कारण काय? बांधकामात काही निष्काळजीपणा झाला होता का? सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का? याबाबत खोपोली पोलीस तपास करीत आहेत.