हुंड्यासाठी 33 वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेचा बळी; सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल, नणंदेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हुंडा प्रथेला कायद्याने कडाडून विरोध असतानाही आजही समाजात हुंडाबळींचे दुर्दैवी सत्र सुरूच आहे. पुण्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. केशवनगर, मुंढवा भागातील ‘व्यंकटेश ग्राफिटी’ सोसायटीत राहणाऱ्या विवाहितेने साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतून नणंदेला अटक केली आहे.

त्रिष्णा सकपाळ (33) असे महिलेचे नाव असून माहेरचे आडनाव निकम आहे. या प्रकरणी त्रिष्णाचे वडील बाळकृष्ण निकम (74) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पती राहुल सकपाळ, सासू वैशाली सकपाळ, सासरे संजय सकपाळ, नणंद शैली सकपाळ (वय 31, रा. ओशिवरा, अंधेरी, मुंबई) आणि आजीसासू शकुंतला यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 108, 85, 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, 2018 मध्ये त्रिष्णाचा विवाह राहुल सकपाळ याच्यासोबत झाला होता. लग्नापासूनच सासरच्या मंडळींकडून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. वारंवार पैशांसाठी तसेच फ्लॅट खरेदी करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. विशेषतः तिच्या वडिलांच्या नावावर असलेला व्यंकटेश ग्राफिटीमधील फ्लॅट सासरच्यांच्या नावावर करून देण्यासाठी तिच्याकडे सतत तगादा लावला जात होता. पती राहुल याचे दुसरे लग्न करायचे असल्यामुळे तो त्रिष्णाला घटस्फोट देण्याकरिता प्रचंड मानसिक त्रास देत होता. याशिवाय, नणंदेच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादाही लावला जात होता. या अमानुष आणि अपमानास्पद वागणुकीला आणि सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर त्रिष्णाने 29 सप्टेंबर रोजी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

मृत्यूपूर्वी त्रिष्णाने एक अत्यंत सविस्तर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने पतीसह सासरच्या लोकांच्या असह्य त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले असून, तिच्या मृत्यूला हे सर्वजणच जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट असलेली वही, साडीचे तुकडे, चाकू, पेन, दोन लॅपटॉप आणि एक मोबाईल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या मोबाईलमध्ये सासरच्या मंडळींसोबत झालेल्या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांच्या हाती लागले असून, यामुळे या प्रकरणातील छळाचे पुरावे अधिक बळकट झाले आहेत. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत मुंढवा पोलिसांनी 3 ऑक्टोबर रोजी मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या नणंद शैली सकपाळ हिला मुंबईतील अंधेरी येथून शिताफीने अटक केली. अंधेरी रेल्वे मोबाईल कोर्टाकडून तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवून तिला पुण्यात आणण्यात आले आहे. याप्रकरणी उर्वरित फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच, आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी आणि आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी शैली सकपाळ हिची पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर यांनी न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर केला आहे. मुंढवा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.