कोस्टल रोडवर मातीचा अनधिकृत भराव, खासगी कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी बांधकाम साईट्सवरून आणलेल्या मातीचा ढिगारा विनापरवाना कोस्टल रोड प्रकल्पाच्या स्थळी टाकल्याबद्दल महापालिकेने एल अॅण्ड टी आणि एचसीसीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून 72 तासांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

बांधकाम आणि पाडकामाचा कचरा निर्माण झालेल्या ठिकाणापासून ते थेट अधिकृत विल्हेवाट लावण्याच्या ठिकाणापर्यंत ट्रक करण्यासाठी पालिकेने नुकतेच ‘मुंबई डिब्रिस कंट्रोल अँड ट्रकिंग सिस्टम’ पोर्टल सुरू केले आहे. याआधारे पालिकेने ही कारवाई केली आहे. पालिकेच्या पथकाने 1 ऑक्टोबर रोजी हाजी अली ते पीडीपी गार्डनदरम्यानच्या कोस्टल रोडच्या पट्टय़ाची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान तिथे मोठय़ा प्रमाणावर माती भरावाचे काम सुरू असल्याचे दिसून आले. वाहनांची माहिती आणि वाहतूक चलनांची तपासणी केल्यानंतर भरावासाठी वापरली जाणारी माती मुंबईतील खासगी इमारत बांधकामांच्या ठिकाणांहून आणली जात असल्याचे दिसून आले.

72 तासांत उत्तर द्या, अन्यथा कारवाई

टेंडरमधील अटींनुसार भरावासाठी लागणारी सामग्री केवळ अधिकृत खदानी किंवा वैध परवान्या असलेल्या स्रोतांकडूनच मिळवणे बंधनकारक आहे, मात्र संबंधित कंत्राटदाराने या नियमांचे उल्लंघन अनधिकृत माती वापरल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. ही कृती ‘कन्स्ट्रक्शन अँड डिमॅलिशन वेस्ट मॅनेजमेंट रूल्स’ उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच प्रकल्पाच्या तांत्रिक अटींच्या विरुद्ध आहे. माती भरणीचे काम तत्काळ थांबवावे. तसेच, साहित्याचा स्रोत, वैध वाहतूक परवाना, रॉयल्टी चलान आणि जिओटेक्निकल टेस्ट रिपोर्टस्सह सर्व संबंधित कागदपत्रे 72 तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास अनधिकृत साहित्य स्वतःच्या खर्चाने हटवून पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.