Best Bus Accident – चेंबूरमध्ये बेस्ट बसला टँकरची धडक, चार प्रवासी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident

चेंबूरमध्ये बेस्ट बसला टँकरने धडक दिल्याने अपघातात चार प्रवासी जखमी झाले. चेडा नगर सिग्नलजवळ बुधवारी सकाळी 6.55 वाजता ही घटना घडली. जखमींमध्ये एक अल्पवयीन मुलगी, एक तरुणी आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दोन्ही जखमी महिलांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका पुरुष प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून दुसऱ्याला नातेवाईकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड आगारातील भाडेतत्वावरील बस वैशाली नगरकडून माहुलच्या दिशेने चालली होती. छेडा नगर सिग्नलजवळ अचानक एक मोटारसायकल बससमोर आल्याने बस चालकाने ब्रेक दाबला. यावेळी मागून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या टँकर बसच्या उजव्या बाजूच्या मध्यमाभागावर धडकला. या धडकेमुळे उजव्या बाजूच्या खिडक्यांच्या तीन काचा फुटल्या आणि चार प्रवासी जखमी झाले.

बस आणि टँकर दोन्ही वाहने पोलिसांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात नेली आहेत. पुढील कारवाई सुरू आहे. भाग्यश्री खेडकर (14), अदिती कोयंडे (22) अशी जखमी मुलगी आणि तरुणीचे नाव असून जखमी पुरुषांची नावे समजू शकली नाही. काच फुटल्यामुळे भाग्यश्री खेडकर हिच्या उजव्या डोळ्याखाली दुखापत झाली. तर अदिती कोयंडे यांच्या उजव्या कोपराला आणि उजव्या पायाला काचेमुळे दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.