
दिव्यातील साबेगाव परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत उभ्या असलेल्या 23 गाड्यांना आग लागली. या अग्नितांडवात एक रिक्षा आणि 22 दुचाकी जळून खाक झाल्या. ही आग नेमकी कशामुळे लागली, ती लागली की लावली याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.
दिव्यातील अनेक इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्था नसल्याने अनेक रहिवाशांना आपल्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या कराव्या लागतात. साबेगाव येथील आदर्श विद्यालयासमोरील रस्त्यावरही रहिवाशांनी आपली वाहने उभी केली होती. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आगडोंब उसळला आणि यात एका रिक्षासह 22 दुचाकी जळून खाक झाल्या.
या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस आणि ठाणे पालिकेच्या अग्निशमन दल पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तोपर्यंत सगळ्या गाड्या खाक झाल्या होत्या. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.




























































