
एमआयडीसी उभारण्यासाठी खर्डी व परिसरातील 706 शेतकऱ्यांची 315 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र वरस्कोळ, सुगाव, बेंडेकोन, पिंपळपाडा व खर्डी येथील 34 शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन केले. एवढेच नव्हे तर सात-बारा उताऱ्यावरील इतर अधिकार या रकान्यात ‘खर्डी औद्योगिक विकास महामंडळ भूसंपादन’ अशी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून आधी मोबदला द्या.. मगच जमिनीची मोजणी करा, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. खर्डीतील शेतकऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आपला संताप व्यक्त केला.
तहसीलदार कार्यालयात एमआयडीसीने शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी व मोजणीसाठी संमती द्यावी याकरिता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शहापूर येथील तहसीलदार कार्यालयात आज बैठकीचे आयोजन केले होते. बाधित शेतकऱ्यांच्या भावना व त्यांच्या मागण्या वरिष्ठांना कळवून पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेश महाडिक यांनी यावेळी सांगितले. सहा वर्षांपासून खर्डी एमआयडीसीकरिता खर्डी परिसरातील 5 गावांची जमीन अधिग्रहित करून त्यातील 34 शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारावर एमआयडीसीचा शिक्का मारला आहे.
त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कोणताही मोबदला न देताच एमआयडीसीचे अधिकारी 9 सप्टेंबर रोजी ती जमीन मोजणीसाठी आले होते. त्यावेळी येथील बाधित शेतकऱ्यांनी मोबदला द्या व मगच मोजणी करा अशी मागणी करत मोजणी बंद पाडली. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून एमआयडीसी अधिकाऱ्यांशी लवकरच मिटिंग लावतो, असे आश्वासन दिले होते त्याअनुषंगाने आज बैठक घेण्यात आली.
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता खर्डी औद्योगिक विकास महामंडळ भूसंपादन अशी नोंद करण्यात आली आहे. ही नोंद शेतकऱ्यांच्या 7/12 वर झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना बँकेकडून कोणतेही पीक कर्ज किंवा विविध कार्यकारी सोसायटीचे लाभ मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कुटुंब अडचणीत येऊन त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.



























































