
IPL 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा खेळ दमदार राहिला होता. संघाला विजेतेपद पटाकावता आले नाही पण तिसऱ्या क्रमांकावर राहत संघाने धडाकेबाज कामगिरीच प्रदर्शन केलं. आता पुढील IPL 2027 च्या हंगामासाठी संघाने विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन फ्रँचायझींनी खेळाडूंच्या अदलाबदलीचा (Trade) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वेगवान गोलंदाज टी नटराजन पुन्हा एकदा आपल्या जुन्या संघात परतला असून, त्याच्या बदल्यात डावखुरा फिरकीपटू झिशान अन्सारीने दिल्ली कॅपिटल्स संघात प्रवेश केला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल 2025 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 10 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावून टी नटराजनला आपल्या संघात समाविष्ट केले होते. मात्र, आता या ट्रेडनंतर नटराजन 5 कोटी रुपयांच्या सुधारित मानधनावर पुन्हा सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. नटराजनने 2024 च्या हंगामात एसआरएचकडून खेळताना सर्वाधिक 19 विकेट्स घेत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्या पुनरागमनामुळे एसआरएचची गोलंदाजी विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये अधिक मजबूत होणार आहे.
या अदलाबदलीत, झिशान अन्सारी आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल. आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना त्याने 10 सामन्यांत 6 विकेट्स टिपल्या आहेत. विशेषतः दिल्लीविरुद्धच्या पदार्पण सामन्यातच 3 विकेट्स घेत त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. अवघ्या 40 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत दिल्लीच्या संघात सामील झालेला २६ वर्षीय अन्सारी कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजीच्या आक्रमणाला अधिक बळकटी देईल, अशी संघासह दिल्लीच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.




























































