शिवाजी पार्कात आजपासून भाविकांचा जनसागर; बंगाल क्लबच्या दुर्गापूजेत ‘निसर्गसंवर्धना’चा संकल्प!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर यंदा बंगाल क्लबतर्फे 91 व्या दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 21 ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱया या सोहळ्यासाठी तब्बल 10 हजार चौरस फुटांचा भव्य आणि पर्यावरणपूरक मंडप साकारण्यात येणार आहे. यंदा या पूजेला आठ लाखांहून अधिक भाविक आणि पर्यटक भेट देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यंदा ‘माँ दुर्गा म्हणजेच प्रकृती; जीवनदायिनी आणि प्रचंड सामर्थ्यशाली’ ही मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे. निसर्गाची सर्जनशीलता आणि तिचे रौद्र रूप यांचा दुर्गामातेच्या स्वरूपाशी मेळ साधत देवीची मूर्ती व मंडपाची सजावट केली जाणार आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक रुपिन सुचक या सजावटीची धुरा सांभाळत असून कापड, बांबू आणि धातूच्या वस्तूंचा वापर करून पर्यावरणपूरक संदेश दिला जाणार आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम

चार दिवसांच्या उत्सवात भाविकांसाठी महाप्रसाद, पारंपरिक धार्मिक विधी, कुमारिका पूजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. तसेच हस्तकला प्रदर्शन आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असल्याने मुंबईकरांना बंगालच्या समृद्ध संस्कृतीचा व खाद्यवैभवाचा आनंद घेता येणार आहे.