
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने हा मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी आता सौरभ कटियार पुढील आदेशापर्यंत या पदाची सूत्रे सांभाळतील. त्यांनी याआधी एमपीएससीच्या सचिवपदाचे अतिरिक्त कामकाज पाहिले आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन पूर्णवेळ सचिव नेमण्यापूर्वी त्यांच्याकडे प्रभारी सचिवपदाची सूत्रे दिली आहेत.
यापूर्वी अभय वाघ यांनी काही महिने प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी वाघ यांच्यावरही गंभीर आरोप केले असल्याने त्यांच्याकडे पुन्हा एकदा प्रभारी अध्यक्षपद सोपविण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2023 मध्ये नियुक्त केलेले सर्वात वरिष्ठ सदस्य म्हणून सतीश देशपांडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभारी अध्यक्षपदी कोण?
एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार कुणाकडे सोपवणार, याविषयी उत्सुकता आहे. सध्या आयोगात भीमनवार यांच्यासह अभय वाघ, सतीश देशपांडे, राजीव निवतकर, महेंद्र वारभुवन, दिलीप भुजबळ-पाटील हे सदस्य कार्यरत आहेत.































































