
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱया मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या खटल्यातील नराधम विजय खैरनार याला न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठावली. पीडित कुटुंबीयांनी आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 16 नोव्हेंबर 2025ला एकवीस वर्षीय विजय खैरनार याने साडेचार वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले, अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 23 दिवसात 425 पानांचे आरोपपत्र दाखल केले. जनतेमधील आक्रोशामुळे या नराधमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करून खटल्याची सुनावणी करण्यात आली.
या खटल्यात पोलीस, ग्रामस्थ, वैद्यकीय अधिकारी, पीडित कुटुंब यांच्यासह 24 साक्षीदार तपासण्यात आले. 30 सप्टेंबरला अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने खैरनार याला दोषी ठरविले. त्यानंतर शुक्रवारी त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. अपहरण व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, अॅड. संजय सोनवणे, अॅड. स्नेहा शर्मा, अॅड. हर्षल तिवारी यांनी कामकाज पाहिले.
नराधम पुन्हा जन्माला यायला नको
माझ्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हे नुकसान भरून निघणार नाही. पण, तिच्यासह असा अन्याय झालेल्या मुलींना न्याय मिळावा, त्यासाठी हा लढा होता. असा नराधम पुन्हा जन्माला यायला नको. त्याला फाशी देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, असे मत हत्या झालेल्या मुलीच्या वडिलांनी व्यक्त केले.
























































