Ratnagiri News – आरे वारेतील स्थानिकांच्या रोजीरोटीवर वन विभागाकडून बुलडोझर, किनाऱ्यावरील स्टॉल उध्वस्त केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्‍यातील आरेवारे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढताच स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर स्थानिक ग्रामस्थांनी स्टॉल उभारून व्यवसाय सुरू केले होते. वनविभागाने या स्टॉलवर बुलडोझर चालवून स्थानिकांची रोजीरोटी उध्वस्त केली आहे.

आरेवारे समुद्रकिनारी पर्यटकांच्या सेवेसाठी काही ग्रामस्‍थांनी चहा-वडापाव स्‍टॉल, नारळपाणी, कोकणी पध्‍दतीचा नाष्‍टा, समुद्रात भिजून येणार्‍या पर्यटकांसाठी आंघोळीची व्‍यवस्‍थाही केली होती. याठिकाणी रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा जवळपास 20 ते 21 स्‍टॉल उभारण्‍यात आले होते. रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजुला वाळूचा भाग असल्‍याने, या स्‍टॉलला मजबुती मिळावी यासाठी काहींनी चिरे, मातीचा भराव टाकून ओटेही बांधले होते.

सध्‍या सुरुबनामध्‍ये वनविभागाचा ट्री हाऊस प्रोजेक्‍टचे काम सुरु आहे. यातच काही लोकांनी आपापसातील वादातून वनविभागाकडे तक्रार केल्‍याचे वनविभागातील अधिकार्‍यांकडून या स्‍टॉलवाल्‍यांना सांगण्‍यात आले. मात्र निनावी तक्रारीची दखल घेत वनविभागाच्‍या अधिकार्‍यांनी या स्‍टॉलधारकांना कोणतीच कल्‍पना न देता अचानक या स्‍टॉलवर जेसीबी व बुलडोझरच्‍या सहाय्‍याने मोठ्या फौजफाट्यासह कारवाईला सुरुवात केली.

आरेवारे येथे दुर्घटना घडल्‍यास हेच स्‍टॉलधारक मदतीला धाव घेत असत. मात्र त्‍यांच्‍या पोटावर लाथ मारण्‍याचे काम वनविभागाच्‍यावतीने करण्‍यात आल्‍याच्‍या भावना ग्रामस्‍थांमधून व्‍यक्‍त करण्‍यात आल्‍या. यामध्‍ये वैभव वाडकर, शामल पारकर, अर्चना मयेकर, दिपाली मयेकर, नवज्‍योत मयेकर, संदीप मयेकर, वैभव मयेकर, रवि शिवलकर, रवी पारकर, उल्‍का बनप, विलास चौगुले, शितल शिवलकर, आशिष कनगुटकर, अजय बिर्जे, रणजीतसिंग मालगुंडकर, अमोल घाग, वैभव प्रकाश मयेकर, नरेश मयेकर, संगिता मयेकर, साहील मयेकर, प्रिती मयेकर या स्‍टॉलधारकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. स्‍टॉलधारक व त्‍यांच्‍या कुटुंबियांमध्‍ये वनविभागाच्‍या कारवाईबाबत तीव्र रोष व्‍यक्‍त केला जात आहे.

त्या अधिकाऱ्याला निलंबित करणार- पालकमंत्री

वनविभागाने परस्पर कारवाई करून आरेवारे येथील स्थानिक ग्रामस्थांची रोजीरोटी उध्वस्त केली. त्याबाबत आज पालकमंत्री उदय सामंत नाराजी व्यक्त करताना संबंधित गायकवाड नावाच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नसिंधू योजनेतून ग्रामस्थांना नवीन स्टॉल बांधून देऊ, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.