आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि महिलांवरील पोलिसांची अमानुष मारहाण लज्जास्पद, हा आवाज दाबण्याचा कट – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“ज्या दिवशी सत्ता हातातून निसटेल, त्या दिवशी मनमानीचाही अंत होईल,” असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे. शनिवारी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि महिलांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ते आंदोलनादरम्यान पोलिसांच्या मारहाणीला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. या व्हिडीओसोबत त्यांनी एक सविस्तर पोस्टही लिहिली आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की, “लैंगिक छळ, कपडे ओढणे आणि खाजगी अवयवांवर हल्ला करणे, लोकशाहीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या क्रूरतेने सर्व लाजीरवाण्या मर्यादा ओलांडल्या आहेत.”

‘हा आवाज दाबण्याचा कट’

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “हे सर्व आवाज दाबण्याच्या कटाचा एक भाग आहे. यामध्ये लोकांना एवढे घाबरवले जाते आणि त्यांचा इतका अपमान केला जातो की, जेणेकरून पुन्हा कोणीही प्रश्न विचारण्याची हिंमत करू नये.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधी यांनी लिहिले की, “पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना माहीत आहे की, ज्या दिवशी सत्ता त्यांच्या हातातून निसटेल, त्याच दिवशी त्यांच्या मनमानीचाही अंत होईल. हीच सत्ता गमावण्याची भीती पोलिसांपर्यंत पोहोचते आणि देशातील तरुण व महिलांवर हिंसेच्या रूपात बाहेर पडते.”