
शिवसेनेचा विराट दसरा मेळावा शिवतीर्थावर मंगळवारी पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. देशातील सद्य राजकीय परिस्थिती, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी उठलेले देशव्यापी वादळ, विद्यार्थ्यांची आंदोलने, दुष्काळी परिस्थिती आणि भाजप सरकारचा मनमानी कारभार या पार्श्वभूमीवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून संविधान रक्षणाच्या लढय़ाची मशालच यावेळी पेटणार आहे.
देशावर आणि महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यावेळी शिवसेना आक्रमक झाली. आजही सत्ताधाऱ्यांच्या जुलमी कारवायांनी देशातील विद्यार्थी, तरुणवर्ग आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला आहे. देशात तिरंगा फडकवणेही गुन्हा ठरत आहे. संविधानच धोक्यात आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांसह शिवसेनाही संविधान रक्षणासाठी प्रचंड ताकदीने रस्त्यावर उतरली आहे. अशा वातावरणात होणाऱया दसरा मेळाव्यात शिवसैनिक आणि मराठी माणसाला उद्धव ठाकरे कोणता संदेश देणार याबद्दल देशभरात उत्सुकता आहे.
वाजतगाजत गुलाल उधळत या
दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. भव्य व्यासपीठ उभारले जात आहे. मेळाव्याचा टीझरही प्रसिद्ध झाला आहे. ‘मंगळवारी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या दसरा मेळाव्याला संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या, वाजतगाजत गुलाल उधळत या’, असे आवाहन या टीझरद्वारे करण्यात आले आहे. शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
जेन झींमध्येही मेळाव्याची उत्सुकता
नीट आणि एमपीएससी परीक्षाफुटीविरुद्ध विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर तसेच पुण्यामध्ये केलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा सक्रिय पाठिंबा लाभला होता. नीट पेपरफुटीविरुद्धचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेने विजयी मेळावाही आयोजित केला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तिरंगा आंदोलनही केले गेले. पोलिसांनी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि जेन झींच्या सुटकेसाठी शिवसेनेने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात जेन झींचीही मोठय़ा संख्येने उपस्थित असणार आहे.






























































