
माणगाव तालुक्यातील कडापे येथे कालिकामाता देवी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या या देवस्थानात नवरात्रोत्सवामध्ये मुंबई, पुणे, सुरत आदी शहरांतून असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. संकटांचे निवारण करणारी आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी अशी कालिकामातेची ख्याती आहे.
आख्यायिकेनुसार श्री बापूजीबुवांनी भक्तांच्या रक्षणासाठी कालिकामातेला कडापे येथे बोलावून घेतले. धाविणीचा वेष धारण करून आलेल्या कालिकामातेला बापूजीबुवांनी थांबवले आणि भक्तांच्या रक्षणासाठी कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली. देवीने त्यांची विनंती मान्य केली. मात्र बापूजीबुवांच्या उजव्या बाजूला आणि भूमीत वास्तव्य करण्याची अट घातली. त्यामुळे आजही मंदिरात प्रथम बापूजीबुवांची पूजा केली जाते आणि त्यानंतर कालिकामातेची पूजा होते. कडापे गावात कायमचे वास्तव्य केल्यामुळे कालिकामाता ‘कडापकरीण’ या नावानेही प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. रंगीबेरंगी मानाच्या काठ्यांची मिरवणूक आणि नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांमुळे मंदिर परिसर भक्तिमय होतो. श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या या देवस्थानात दरवर्षी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते.
रसायनीची टाकेदेवी
रसायनीतील वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या वेशीवर प्राचीन असे टाकेदेवीचे मंदिर आहे. नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस अखंड भक्तीचा गजर घुमतो. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांची येथे रेलचेल असते. रसायनीसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारे भाविक दरवर्षी नवस फेडण्यासाठी मंदिरात गर्दी करतात.
टाकीमाता देवीचे मूळ स्थान चौक गावाजवळ इर्शाळगडावर असल्याचे जाणकार सांगतात. पूर्वी देवीच्या स्थानाजवळ असलेल्या कुंडाजवळ उभे राहून नवसाचे जेवण बनवण्यासाठी भांडी पाहिजेत, अशी प्रार्थना भाविक करायचे. त्यानंतर जेवणाचे मोठमोठे टोप तिथे अचानक येत होते. जेवण बनवून झाल्यावर भाविक ते टोप पुन्हा पाण्याच्या कुंडाजवळ नेऊन ठेवत. दरम्यान ते टोप परत पाण्याच्या कुंडात गायब होत होते, अशी आख्यायिका आहे. चारशे ते पाचशे वर्षे जुने देवीचे स्थान असून येथे दगडातच देवीचा टाक आहे. या मंदिरात देवीच्या सहा बहिणी आणि एक भाऊ अशा सात मूर्ती काताळातच कोरलेल्या आहेत. काताळासमोर 15 ते 20 फूट पाण्याची राता आणि चौका अशी दोन पाण्याची कुंड आहेत. कुंडामध्ये अखंड पाण्याच्या झरे असून वर्षभर या कुंडात पाणी असते. या देवस्थानच्या वतीने विशेष कार्यक्रमात अन्नदान केले जाते. तसेच दरवर्षी दहा गरीब जोडप्यांची लग्नं लावली जातात, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष सतीश महाडिक यांनी दिली.



























































