तब्बल 29 गुन्हे दाखल असलेली टोळी गजाआड; नगर स्थानिक गुन्हे शाखा, तालुका पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गंभीर स्वरूपाचे 29 गुन्हे दाखल असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा व नगर तालुका पोलिसांनी अटक केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. मंगळवारी पहाटे कामरगाव शिवारात सापळा लावून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

रमेश सावत्या उर्फ सावंत भोसले (वय 31), अविनाश सावंत उर्फ सावत्या भोसले (वय 19) व एक महिला (सर्व रा. पिंपळगाव कौंडा, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

नगर तालुका ठाण्यात दाखल असलेल्या गुह्यात अटक करण्यासाठी नेप्ती बीट अंमलदार भरत धुमाळ हे कामरगाव शिवारात गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. 17 नोव्हेंबर 2021 रोजी ही घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून हे सर्व पसार होते. हे आरोपी कामरगाव शिवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी पहाटे कामरगाव शिवारात सापळा लावून अटक केली.

हेडकॉन्स्टेबल धुमाळ हे नेप्ती बीट हद्दीत कामरगाव येथे गुह्याच्या तपासाचे सरकारी काम करीत असताना यातील आरोपीने पोलिसांनी अटक करू नये म्हणून जमाव जमवून लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हा गुन्हा 17 नोव्हेंबर 2021 रोजी दाखल असून, आरोपी तेव्हापासून पसार झालेले होते. या आरोपींविरुद्ध नगर तालुका पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला जबरी चोरी, घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुह्यांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत आहेत. या गुह्यातील आरोपी रमेश सावत्या उर्फ सावंत भोसले, अविनाश सावंत उर्फ सावत्या भोसले व एक महिला आरोपी हे कामरगाव येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सानप यांना मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी सापळा लावून आरोपींना अटक करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, रंजित मारग, सोपान गोरे, सहायक फौजदार धुमाळ, हेडकॉन्स्टेबल गव्हाणे, गांगुर्डे, सोनवणे, लबडे, कदम, राहुल शिंदे, खेडकर, जाधव, संगीता बडे, फुंदे, धनवडे, पवार, भालसिंग, टकले, खिळे, वडणे, बांगर, माने, ठाणगे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, विश्वास बेरड, सागर ससाणे, संदीप दरंदले, रोहित येमुल, शंकर चौधरी, रवींद्र घुंगासे, विशाल दळवी, संतोष लोंढे, राहुल सोळंके, जालिंदर माने, सचिन आडबल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.