
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा… असे सांगत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले वहिनींचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर. बांदेकर यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या चांगुलपणाने जनतेचं मन जिंकून घेतलं आहे. त्यांनी नुकतीच त्यांच्या 99 वर्षाच्या चाहतीची भेट घेतली ती देखील त्यांच्या वाढदिवशी. आजीबाईंनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं ते आदेश बांदेकरांसोबतच. ते ही आदेश बांदेकरांनी दिलेली पैठणी घेऊन.
नलिनी जोशी असे त्या आजीबाईंचे नाव असून त्या आदेशबांदेकरांच्या चाहत्या आहेत. होम मिनिस्टर लागलं की आदेशजी आपल्याशीच गप्पा मारतायत असे त्यांना वाटते. त्यामुळे त्या हा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्यासाठी गाणं देखील गातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा दिनक्रमच झाला आहे. त्या आजीबाईंविषयी जेव्हा आदेश बांदेकरांना समजले तेव्हा त्यांनाही या आजीबाईंना भेटायची इच्छा झाली. त्यांनी लवकरच आपण आजीबाईंना भेटू असे आश्वासन दिले.
सांगलीतील या आजीबाईंनी नुकतीच वयाची 99 वर्षे पूर्ण केली. त्यांच्या वाढदिवसाला त्यांचे सर्व नातेवाईक हजर होते. इतक्यातच आदेश भावोजी आले अशी कुजबूज सुरू झाली आणि आजीबाई थबकल्याच. नक्की काय सुरू आहे हे कळायच्या आतच आदेश बांदेकर प्रसन्न चेहऱ्याने त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांना पाहून आजीबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर आजीबाईंना बांदेकरांना पैठणी भेट दिली. आजीबाईंना पाहून आदेश बांदेकरांना त्यांच्या आई आठवल्या व त्यांचेही डोळे पाणावले.





























































