
सामना प्रतिनिधी । परभणी
यंदाचा दुष्काळ ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच भीषण होत चालला आहे. आग लागून पीके जळून जावीत, अशी अवस्था पीकांची झाली आहे. ग्रामीण भागातील लोक स्थलांतरीत होत आहेत. परंतु शहरातील उद्योगधंदेही बंद पडत आहेत. अशा अवस्थेत शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना कर्जमुक्तीही मिळाली नाही आणि योग्य पीकविमाही मिळाला नाही. आता यापुढचे आंदोलन पीकविमा व कर्जमुक्तीसाठी असेल, असा स्पष्ट खणखणीत इशारा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज परभणी येथे दिला.
PHOTO : आदित्य ठाकरे यांचा हिंगोली व नांदेड दौरा
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे जय भवानी महिला सुतगिरणीचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर त्याच ठिकाणी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दुष्काळ निवारण शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला संबोधीत करताना आदित्य ठाकरे यांनी या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा मराठवाडा दौरा करत असल्याचे सांगितले.
या दौऱ्यात आपण शेतकऱ्यांची अवस्था जवळून पाहिली आहे. आग लागून जळून जावीत, अशी पीके आपण प्रत्यक्ष पाहिली. त्यांच्या हातातोंडचा घास हिरावून गेला आहे. सर्वच ठिकाणी पाण्याचे हाल…हाल दिसत आहेत. एरवी मार्च-एप्रिल महिन्यामध्ये दुष्काळ दिसून येतो. परंतु यंदा मात्र ऑक्टोबर-नोंव्हेबर पासून भीषण दुष्काळ होत चालला आहे. लोक शहरांकडे स्थलांतरीत होत आहेत. परंतु तेथील उद्योगधंदे सुद्धा बंद पडत आहेत. काय करावं? असा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. यातच शेतकऱ्यांना पीकविमा सुद्धा योग्य मिळाला नाही. पी. साईनाथ यांनीच आपल्या अहवालात शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यानी कशी फसवणूक केली आणि तो गैरव्यवहार राफेल पेक्षाही मोठा असल्याचे सांगितले आहे.
मोठा गाजा-वाजा करुन केलेली कर्जमुक्ती सुद्धा किती फसवी होती, हे आता स्पष्ट झाले आहे. सरकार कर्जमाफी केली असे म्हणते. परंतु माफी गुन्हेगाराला करत असतात. शेतकऱ्यांनी काय गुन्हा केला आहे? मला आत्तापर्यंत एकही शेतकरी भेटला नाही, की त्याची कर्जमुक्ती झाली आहे. वचनपूर्वी त्यांची झालीच नाही. कर्जमुक्तीची यादी तयार करावी लागेल. त्याशिवाय सरकारला जाग येणारही नाही. आता तुमच्यासाठी लढत राहू, भांडत राहू. आता शेतकऱ्यांसाठी यापुढचे आंदोलन पीकविमा व कर्जमुक्ती या विषयावरच राहणार आहे. तुमच्यासाठी हे आंदोलन आपण करणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले.
आम्ही शहरीबाबू आहोत. आम्हाला पीकातील, शेतातील काही कळतही नसेल. परंतु ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी मते मागण्यासाठी आलेलो नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहून दु:ख होते. तुम्हाला कितीही अडचण आली असेल तर आमची आठवण काढा. शिवसेना मदत करेल. स्वत: बरं-वाईट करु नका. त्यावर मात करुन पुढे जावू. स्त्री, वृद्ध, बालक, विद्यार्थी-विद्यार्थीनी अशा समाजातील कोणीही आत्महत्येच्या मार्गाला जावू नका, अशी कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. राहुल पाटील यांचे अभिनंदन
आमदार डॉ. राहुल पाटील यांचा मला अभिमान वाटतो. अशा दुष्काळी परिस्थितीत त्यांनी महिलांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाला सतत भांडून खास महिलांसाठी या सुतगिरणीची स्थापना केली. सुतगिरणीला वीजबिलाचा त्रास होतो. अनेक सुतगिरण्या विजबिलामुळेच अडचणीत आल्या आहेत. याची जाणीव ठेवून सोलारवर चालणारी त्यांनी ही सुतगिरणी काढली. जगात सोलावर चालणारी ही एकमेव महिलांसाठीची सुतगिरणी असणार आहे. येथे शंभर टक्के समाजकारण केलेले आहे. खरोखरच त्यांचे मी अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.































































