Best भाडेवाढीवरून आदित्य ठाकरेंचा मिंधे सरकारवर निशाणा; मुंबईकरांना दिलं आश्वासन

मुंबई महानगरपालिकेने ‘बेस्ट’ला तिकीट दर वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यात साध्या बसचे दर किमान पाच रुपयांवरून सात रुपये तर एसी बसचे किमान तिकीट सहा रुपयांवरून दहा रुपये होण्याची शक्यता असल्याचं वृत्त आज प्रसिद्ध झालं आहे. या वृत्तानंतर युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारचा खरपूस शब्दात समाचार घेत आपलं सरकार सत्तेत आल्यानंतर असं आश्वासनही दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी X वर पोस्ट करत भाजपच्या नेतृत्त्वातील मिंधे सरकारला घेरलं आहे. ‘येथील भाजपच्या नेतृत्वाखालील मिंधे सरकारनं बेस्टच्या बस भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. भाजप हे मुंबईविरोधी असल्याचे आम्ही नेहमीच म्हणत आलो आणि ही प्रस्तावित भाडेवाढ हा मुंबईकरांचा खिसा कापण्याचा आणखी एक मार्ग आहे’, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

‘प्रथमत: बसेसची संख्या कमी करण्यात आली आहे, बस थांब्यांचे रूपांतर कंत्राटदारांच्या जाहिरात फलकांमध्ये करण्यात आले आहे’, असा घणाघाती आरोप आदित्य ठाकरे यांनी आपल्या X वरील पोस्ट मधून केला आहे.

‘भाडेवाढ का?’, असा सवाल करत ते X वरील पोस्ट म्हणतात की, ‘आम्ही जगातील सर्वात परवडणारे असे भाडे असावे म्हणून तसे भाडे ठेवले होते आणि तरीही आम्ही 10,000 इलेक्ट्रिक बसेसचा ताफा वाढवत आहोत. मात्र मुंबईविरोधी असलेल्या भाजपच्या राजवटीत भाडे वाढवून बसेस कमी करून मुंबईकरांचे हाल होत आहेत’.

पुढे ‘सरकारमध्ये येताच आम्ही ही भाडेवाढ मागे घेऊ’, असं आश्वासन देखील आदित्य ठाकरे यांनी या पोस्ट मधून दिलं आहे.