
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिने दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. आपल्या विषयी खोटा व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या यूट्युब चॅनलविरोधात कारवाई करण्याची मागणी आराध्याने केली आहे. गुरुवारी तिच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
बिग बींची नात आणि ऐश्वर्या-अभिषेक यांची मुलगी म्हणून आराध्या तिच्या जन्मापासूनच प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिच्या आयुष्यावर आणि प्रकृतीवर भाष्य करणारा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रसारित झाला होता. तो ऐश्वर्या आणि अभिषेक यांना अजिबात आवडला नव्हता. त्याविरोधात त्या दोघांनीही कारवाईसाठी पुढील पावलं उचलली होती. त्यानंतर आता आराध्यानेही दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आपल्या विरोधात ज्या माध्यम समूहाने ही बातमी प्रसारित केली आहे, त्या समुहावर कारवाई केली जावी आणि अशा खोट्या बातम्यांवर बंदी आणावी. कारण, आपण अद्याप अल्पवयीन असून या बातम्यांचा विपरित परिणाम आपल्यावर होत आहे, असं आराध्याने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांच्या एकलपीठासमोर 20 एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. बच्चन कुटुंबीयांकडून अद्याप या याचिकेविषयी कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.




























































