
देशाच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा गुजरातमध्ये झाला आहे. एबीजी शिपयार्ड या कंपनीने 28 बँकांना तब्बल 22 हजार 842 कोटी रुपयांचा चुना लावल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) एबीजी शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवालसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एबीजी शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करत असून गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे शिपयार्ड आहेत. कंपनीने एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान बँकांना गंडा घातला आहे. एबीजी शिपयार्डने नियम धाब्यावर बसवत अनेक बँकांची फसवणूक केली आहे. एएफआयआरनुसार एबीजी शिपयार्डने एलआयसीची 136 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे, तर एसबीआयला 2468 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. हा पैसा विदेशात पाठवल्याचा आणि गुंतवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. जवळपास दीड वर्षापेक्षा जास्त तपास केल्यानंतर सीबीआयने कारवाई सुरू केली आहे.




























































