
>> आशुतोष कुलकर्णी
पूर्णतः शाकाहारी असलेला आशुतोष पक्का गोडखाऊ आहे.
‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? : खाणं ही आपली मूलभूत गरज आहे.
खायला काय आवडतं? : शाकाहारी आवडतं. महाराष्ट्रीय थाळी असलेलं साधं जेवण मला आवडतं. मी कोणताही पदार्थ तिखट, मीठ आणि हिरवी मिरची नसलेला खातो. साखरेऐवजी गूळ खातो आणि मीठाऐवजी सैंधव म्हणजे काळं घातलेले पदार्थ खाणं पसंत करतो.
खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? : फिटनेसमध्ये खाण्याला सत्तर टक्के महत्त्व आहे, हे तत्त्व लक्षात ठेवतो. त्याप्रमाणे फिटनेसची काळजी घेतो.
डाएट करता का? : निश्चितच करतो. योग्य वेळी, योग्य ते आणि योग्य तेवढंच खाणं अशा पद्धतीने डाएट पाळतो.
आठड्यातून किती वेळा बाहेर खाता? : पंधरा दिवसातून एकदा बाहेर खाणं होतं.
कोणत्या हॉटेलमध्ये जाता? : इटालियन किंवा दाक्षिणात्य उडपी रेस्टॉरंटमध्ये जायला आवडतं. ठराविक असं ठरलेलं नाही.
कोणतं पेय आवडतं? : दूध जास्त आवडतं. गुळाचा चहा दूध पावडर, साधं दूध, पाणी, गूळ, चहाचा मसाला असे सगळे पदार्थ घालून केलेला चहा मी करतो. मी केलेल्या या चहाला अप्रतिम चव असते.
प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं–पिणं कसं सांभाळता? : प्रयोगाच्या दिवशी मध्यंतराच्या वेळीच खातो. सात्त्विक खाणं पसंत करतो. पोळी-भाजी असा आहार घेतो.
स्ट्रीट फूड आवडतं का? : हो, ओली भेळ आणि शेवपुरी आवडते. इंदोरच्या खाऊ गल्लीत खाल्लेली भेळ, शेवपुरी आवडली होती.
घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? : पोळी, भाजी , आमटी आवडते. पुरणपोळी हा माझा फेव्हरेट गोड पदार्थ आहे.
जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? : शक्यतो गोड पदार्थ जास्त असतात. यामध्ये पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड, गुलाबजाम हे पदार्थ असतात.
उपवास करता का? : नाही.




























































