अभिनेत्याच्या मुलाच्या दुकानात चोरी करणारी टोळी गजाआड 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्याच्या मुलाच्या दुकानात चोरी करणाऱ्या चौघांना अखेर गोरेगाव पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. विकास कांबळे ऊर्फ विकी, गौतम कदम, अरुण परदेशी, निसार अली शहा अशी त्यांची नावे आहेत. विकास हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत 30 गुन्हे दाखल आहेत.

तक्रारदार हा एका मराठी अभिनेत्याचा मुलगा आहे. त्याचे गोरेगाव येथे मिठाईचे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरटय़ाने त्याच्या दुकानाचे टाळे तोडून चोरी केली. चोरीचा प्रकार लक्षात येताच अभिनेत्याने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय थोपटे यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुदर्शन पाटील, उपनिरीक्षक अविनाश नलावडे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना विकास दिसला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी विकासला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत गौतम, अरुण, निसारची नावे समोर आली. त्या तिघांना पोलिसांनी अटक केली. विकास हा दुकानाचे टाळे तोडून आत शिरतो. त्यानंतर दुकानातील 5 ते 10 रुपये रक्कम चोरतो. कमी रक्कम असल्याने तक्रारदार पोलीस ठाण्यात जात नाही असे विकासला वाटत असायचे. विकास हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर गौतमविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.