
उद्योगपती गौतम अदानी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. न्यूयॉर्कमधील ‘हिंडेनबर्ग संस्थे’ने जाहीर केलेल्या अहवालात गौतम अदानी व त्यांच्या उद्योग समूहावर गंभीर आरोप केले आहेत. अदानींच्या कंपन्यांकडून शेअर मार्केटमध्ये हस्तक्षेप करण्यात येत असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे. याखेरीज मागील काही दशकांपासून अदानी समूहाकडून अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याचा आरोपही हिंडनबर्गकडून करण्यात आला आहे.
हिंडनबर्ग रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाला आणि त्याच्या भागधारकांना प्रचंड मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकारांनी देखील याचा चांगलाच धसका घेतला असून शेअर बाजारावर देखील त्याचा परिणाम पहायला मिळाला आहे. यानंतर अदानी समूहाने रिपोर्ट फेटाळत मोठा खुलासा केला आहे. पण तरीही बाजारावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसांत अदानींच्या कंपन्यांचं शेअर्स गडगडले आहेत. याचे तीव्र पडसाद शेअर मार्केटमध्ये दिसून येत आहेत. दोन दिवसांत शेअर बाजार एक हजार 647 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे अदानी समूहाचं दोनच दिवसांत तब्बल 4.17 कोटींचं नुकसान झालं आहे. गौतम अदानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते. परंतु, हिंडेनबर्ग संस्थेच्या आरोपांनंतर त्यांच्या संपत्तीत घट होऊन ते चौथ्या स्थानावर घसरले. त्यानंतर आता फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत अदानी थेट सातव्या स्थानावर पोहोचले आहेत.
25 जानेवारीला अदानी यांची एकूण संपत्ती 9.20 लाख कोटी इतकी होती. त्यात जवळपास 19 टक्क्यांनी घट झाली आहे. आता अदानी एकूण 7.76 लाख कोटींचे मालक आहेत. गेल्या तीन वर्षांत अदानींच्या संपत्तीमध्ये तब्बल 819 टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगितलं जातं. अदानींच्या संपत्तीमध्ये तब्बल 100 बिलियन डॉलर्सची वाढ झाली होती.




























































