
ज्याप्रमाणे गुजरात निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले, तशाच प्रकारे आता कर्नाटकची निवडणूक आल्याने महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात पळवली जातील. महाराष्ट्राचे आर्थिक खच्चीकरण व्हावे यासाठी हे सगळं सुरु आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, तुम्हाला याचा राग नाही येत का महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार कोणतेही काम न करता केवळ घोषणा करण्याचं काम करत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, पीक विम्याचा विषय प्रलंबित आहे, यावर कोणतीही चर्चा होत नाही. केवळ एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी महाराष्ट्र मागे चालला आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करणे हा खोके सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे असा घणाघात युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
बुधवारी सकाळी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले की गोवरमुळे आतापर्यंत 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र सरकारकडून त्यावर एकही मेडिकल बुलेटिन येत नाही. सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. कोरोनाच्या काळात आम्ही ज्याप्रमाणे परिस्थिती हाताळली होती, त्याप्रमाणे आता काहीच दिसत नाही. कोरोनाच्या काळात दररोज एक मेडिकल बुलेटिन यायचं. मुख्यमंत्री देखील स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असत. मात्र आता गोवारबाबत कुठेही सत्य परिस्थिती लोकांसमोर आली नाही. दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गोवरच्या बाबतीत महाराष्ट्राने जास्त काळजी घेणे गरजेचे असल्याचे केंद्राने म्हटले आहे. केंद्राकडून अशी सूचना कोरोनाच्या काळातही आली नव्हती.
यावेळी खोके सरकारवर निशाणा साधत आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्योग मंत्री उदय सामंत यांना मी कधी काम करताना पहिलाच नाही. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये सरकारने त्यांना पूर्णपणे बाहेर ठेवलं आहे. मी याबाबतीत मुख्यमंत्र्यांना खुली चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, ते यावर का बोलत आहेत. प्रकल्पाच्या बाबतीत जर कोणी काहीच केलं नसेल तर सामंजस्य करार कशाचा करणार होते. 29 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कंपनी प्रशासनाला का भेटले याच त्यांनी उत्तर द्यावं. सगळं काही ठरल्यानंतरच सामंजस्य करार होतो. त्यामुळे हे खोके सरकारच केंद्राकडे बोट दाखवत आहे. मात्र या प्रकरणावर मुख्यमंत्री सोडून बाकी सगळे बोलत आहेत.
यावेळी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवाजी महाराजांसोबत केलेल्या तुलनेवर आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांना महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो, त्यांची तुलना महाराजांसोबत केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्राचं खच्चीकरण करणे हा एकमेव डाव या सरकारचा आहे. राज्यपाल जसे बोलतात तसेच यांचे मंत्री बोलतात. त्यामुळे आता लोकांसमोर वस्तुस्थिती आली आहे. हा केवळ शिवाजी महाराजांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे. मंगलप्रभात लोढा हे मुंबईची रिअॅलिटी ओळखणारे नाहीत तर रिअल्टी ओळखणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे खच्चीकरण हा भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. राज्यपालांना खोके सरकारने पदमुक्त करायला हवं होतं. मात्र एकाही मंत्र्यांकडून यावर प्रतिक्रिया आलेली नाही.
मागचे वादग्रस्त वक्तव्य झाकावे म्हणून एकामागोमाग एक वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. कदाचित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे यांना वाचवण्यासाठी असावं. मुख्यमंत्र्यांना पेढे भरवणाऱ्या राज्यपालांना त्यांनी दोन शब्द ऐकवायला हवे होते. हे सरकार यायच्या आधी जसे सगळे प्रकल्प राज्यात येत होते तसेच ते यापुढे यावेत आहसी माझी इच्छा आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.






























































