
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांसह आमदारांची भाषा कमालीची बदलली आहे. आता तर थेट अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गेली आहे. भाजप आमदार नीतेश राणे यांनी आज नगर मनपा आयुक्तांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर पोलीसही आपले कर्तव्य बजाविताना दिसत नसल्याचे म्हणत स्वपक्षाच्या गृहमंत्र्यांनाच ‘घरचा आहेर’ दिला आहे.
नगर शहरातील कापडबाजारात अतिक्रमणावरून दोन व्यापाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेची माहिती घेण्यासाठी आमदार नीतेश राणे नगरमध्ये आले होते. यावेळी व्यापाऱ्यांसमोर बोलताना त्यांनी महापालिका आयुक्तांना शिवीगाळ केली. तसेच पोलीस प्रशासनही कर्तव्य बजावताना दिसत नसल्याचे म्हटले आहे. ‘तुम्हाला वाचविणारे आता कोणी राहिले नाही. आपल्याला कोणी वाचवेल, या भ्रमात राहणार असाल, तर तेसुद्धा बघून घेतो,’ अशी धमकीही त्यांनी पोलिसांना दिली.
मनपा कर्मचाऱ्यांची आज निषेध सभा
आयुक्तांना शिवीगाळ केल्याप्रकरणी नगर मनपा कर्मचारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला असून, उद्या सकाळी महापालिका मुख्यालयात निषेध सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे आणि सरचिटणीस आनंद वायकर यांनी दिली आहे.
त्यांची उंची माझ्या शर्टच्या दुसऱ्या बटणापर्यंतच – आमदार जगताप
आमदार राणे यांच्या वक्तव्याचा आमदार संग्राम जगताप यांनी चांगला समाचार घेतला आहे. ‘स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. स्वाभिमान विलीन केलेला आमदार नगर शहरात आला. त्यांच्या उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते माझ्या शर्टच्या दुसऱ्या बटणापर्यंतच आहेत. त्यामुळे आमची नजरानजर होत नाही. नजर मिळवायची असेल, तर त्यांनी मला सांगावे, त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. आमदाराच्या कुटुंबाचा इतिहास काय आहे ते सर्वांना माहीत आहे. नगर शहरात कुणी धमकीची भाषा वापरणार असेल, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असेही आमदार जगताप म्हणाले.




























































