सेल्फीसाठी चाहत्याने अभिनेत्रीच्या कंबरेला विळखा घालून ओढले

दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. हा व्हिडीओ कार्डी बी नावाच्या एका प्रसिद्ध अमेरिकन रॅपरचा होता. लाईव्ह कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने तिच्यावर खाद्यपेय उडवल्यामुळे संतापलेल्या कार्डीने हातातला माईक त्याच्यावर फेकून मारल्याचं त्या व्हिडीओत दिसून येत होतं. या प्रकारावर एका अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली असून तिच्यासोबत घडलेला प्रसंगही शेअर केला आहे.

ही अभिनेत्री म्हणजे आहाना कुमरा. इनसाईड एज, लिपस्टिक अंडर माय बुरका, बेताल, सलाम वेंकी, अवरोध, युद्ध अशा विविध मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमधून तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली. आहानासोबत काही दिवसांपूर्वी एक अप्रिय घटना घडली होती. कार्डी बी हिच्या प्रतिक्रियेविषयी बोलताना तिने तो प्रसंगही माध्यम प्रतिनिधींना सांगितला आहे.

आहाना म्हणाली की, काही दिवसांपूर्वी सेल्फीसाठी आलेल्या एका चाहत्याने माझ्या कंबरेला विळखा घालून ओढायचा प्रयत्न केला होता. असे प्रकार आता वारंवार घडायला लागले आहेत. सेलिब्रिटींच्या खासगी स्पेसचा विचार न करता त्याच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न करणं चूक आहे. आम्हाला चाहत्यांनीच मोठं केलं, त्याविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. पण, आमचीही काही खासगी स्पेस आहे. तिचा आदर राखला जायला हवा. मी कार्डी बी हिची प्रतिक्रिया समजू शकते. चाहत्यांनाही आपल्या मर्यादा कळायला हव्यात, असं आहाना म्हणाली आहे.