लाचप्रकरणात तलाठ्यासह खासगी एजंटला अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संगमनेरात कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिगरशेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल 40 हजार रुपयांची लाच मागणारा तलाठी आणि त्या तलाठय़ासाठी 36 हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे.

धनराज नरसिंग राठोड (वय 40, रा. इंदिरानगर, संगमनेर) असे तलाठय़ाचे तर योगेश विठ्ठल काशीद (वय 33, रा. घुलेवाडी फाटा, ता. संगमनेर) असे खासगी एजंटचे नाव आहे.

संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील बिगरशेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तसेच त्यावर वडील व इतर 11 जणांची नावे असलेला हा उतारा तक्रारदाराला हवा होता. त्यासाठी चिखली येथील तलाठी धनराज राठोड याने तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 36 हजार रुपये देण्याचे ठरले होते. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

पैसे देण्याचे निश्चित झाल्यानंतर राठोड याने हे पैसे संगमनेर येथील सह्याद्री मल्टी सर्व्हिसेसच्या योगेश काशीद याच्याकडे देण्यास सांगितले. राठोड याच्या सांगण्यावरून काशीदला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईवेळी याठिकाणी सेवानिवृत्तीला अवघे काही तास शिल्लक असलेला एक मंडलाधिकारीदेखील उपस्थित होता. पथकाने त्यालाही ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. तसेच पोलिसांच्या मदतीने तलाठी राठोड यालादेखील पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधकच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक अजय गरुड, चालक पोलीस हवालदार विनोद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.