महावितरण छळतेय; सरकार गंमत पाहतेय… नगर तालुक्यातील गुंडेगावातील शेतकऱ्यांची हतबलता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा पाऊस खूप झाला. आता शेतातील पिकं हातात येण्याची वेळ आली आहे. मात्र, वीजवितरण वीजपुरवठा तोडून शेतकऱयांना छळत आहे आणि सरकार गंमत पाहात आहे. मरायला कोणाला आवडतंय; पण आता मरणच स्वस्त झाल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील हतबल झालेल्या तरुण सुशिक्षित शेतकऱयांनी व्यक्त केली.

सध्या महावितरणकडून ग्रामीण भागात वसुली मोहीम सुरू असून, थकीत बिलापोटी कृषी पंपांची वीज कापण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱयांनी आपला संताप व्यक्त केला.

आजच आमची वीज बंद केली आहे. शेतात तूर, कांदा आहे. तोंडाशी आलेला माल वाळत आहे. यावर्षी पाऊस आहे तर वीज नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. सरकार शेतकऱयांची गंमत पाहत आहे. आत्महत्यांसाठी केवळ सरकारच कारणीभूत आहे. कुणालाही जीव द्यायची इच्छा नसते. मग शेतकऱयांचं मरण स्वस्त झालं आहे का, असा सवाल तरुण शेतकरी सागर कासार यांनी केला आहे.

मला शेतीत दोन-तीन लाखांचं उत्पन्न झालं, तर पाच हजार रुपये मी भरणार नाही का? पण अडचणीच संपत नाहीत. आज शेतात गेलं तर, पाण्याचं काय करायचं हा प्रश्न समोर येतो. वीज कुठून घ्यायची, जनरेटरसाठी रोजचं एक हजार रुपये भाडं आहे. शिवाय दोन ते अडीच हजारांचं डिझेल लागतं. शिवाय पिकांना एकदा पाणी द्यायला चार ते पाच दिवस लागतात. म्हणजे हा खर्च 15-20 हजारांवर जातो, असे प्रदीप भापकर यांनी सांगितले.

सरकारने एका हाताने दिले आणि दुसऱया मार्गाने परत घेत आहेत. नैसर्गिक संकटानं आधीच शेतकरी हतबल झाला होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अजून सरकारनं दिलीच नाही. मिळाली तर तुटपुंजी चार-पाच हजारांची रक्कम दिली जाणार. आता वीजबिल भरा म्हणून तीच रक्कम परत सरकार घेऊ पाहतंय, असा संताप शेतकरी संतोष कोतकर यांनी व्यक्त केला.