
रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. इंजेक्शन आणि ऑक्सिजन याची दैनंदिन मागणी आणि प्रत्यक्षात असलेला पुरवठा याचे प्रमाण व्यस्त आहे. मात्र, आहे त्या परिस्थितीला तोंड देत मार्ग बाकाप्रसंग सध्या जिल्हा प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची बाधा पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणात वाढीस लागली. या परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, दरदिवशी वाढत जाणारा बाधितांचा आकडा आणि उपचारासाठी उपयोगात आणल्या जाणाऱया रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या तुटीचा पुरवठा यामुळे नवे आव्हान प्रशासनासमोर ठाकले आहे. तुटीच्याप्रसंगीही काही महाभागांनी नामी संधी मानली. बाधितांवर उपचारासाठी डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीत रेमडेसिविर असल्याने बाधितांच्या नातेवाईकांची या इंजेक्शनची शोधमोहीम करण्यासाठी पायपीट सुरू झाली. मात्र, सध्या या इंजेक्शनची निर्मिती करणाऱया चारही कंपन्यांकडून मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा होत आहे.
या परिस्थितीत होणाऱया काळ्या बाजाराची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासाठी थेट निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांची नियुक्ती केली आहे. मात्र, गरज चार हजाराची आणि पुरवठा हजार, बाराशे असा कमी असल्याने इंजेक्शनची टंचाई कमी होण्याचे नाव घेत नाही. हीच परिस्थिती ऑक्सिजनच्या बाबतीतही प्रकर्षाने आढळून येत आहे.
जिह्यात सध्या उपचार सुरू असणारी कोरोनासंख्या जवळपास 12 हजार आहे. यापैकी काही रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने 1 एप्रिलच्या आदेशातच उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून ऑक्सिजनचा वापर करणे बंद केले आहे. सध्या बाधितांवर उपचार करण्यासाठी असलेली ऑक्सिजनची गरज आणि त्याची उपलब्ध मात्रा याचे प्रमाण व्यस्त आहे.
या प्रमाणाचा मेळ घालण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. पुणे जिह्यातील चाकण, फुरसुंगी येथील ऑक्सिजन उत्पादकांच्या सोबत त्यांच्या अधिकृत डीलरमार्फत प्रशासन पाठपुरावा करीत आहे. तसेच, रेमडेसिविर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठीदेखील प्रशासनातील अधिकाऱयांची फोनाफोनी सुरू आहे.
दैनंदिन उपाययोजना करतानाच इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या प्रमाणाचा मेळ घालण्याची कसरत प्रशासनाला सध्या करावी लागत आहे.
बेडच्या माहितीसाठी कंट्रोल रूम
n जिह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱया बेडची माहिती रिअल टाइम पद्धतीने नागरिकांना मिळण्यासाठी कंट्रोल रूम (दूरध्वनी क्र.0241-2345460) कार्यान्वित करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व सहायक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी जारी केले आहेत.
































































