मैत्र जिवांचे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ज्योत्स्ना गाडगीळ

एक आयुष्य आपण किती तऱ्हेने जगू शकतो, हे सांगणारी मंडळी आपल्या सभोवताली असतात. असे लोक एका आयुष्यात अनेक भूमिका वठवतात. सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करून `ज्योत से ज्योत’ लावत दुसऱ्याने आयुष्य उजळून टाकतात. असेच एक आहेत, अँटॉप हिल येथील सर्पमित्र आणि अंधमित्र भरत जोशी.

कोणी कुत्रा पाळतो, तर कोणी मांजर. कोणी गाय, तर कोणी म्हैस! परंतु सर्पमित्र भरत जोशी यांनी एकेकाळी घरात चक्क साप पाळले होते. हौस म्हणून नव्हे, तर शैक्षणिक गरज म्हणून! तसा परवानाही त्यांच्याकडे होता. पुढे कायदा बदलला आणि त्यांनी पाळलेले साप जंगलात सोडून दिले.

भरत जोशी यांच्या नावापुढे सर्पमित्र आणि अंधमित्र ही दोन्ही बिरुदे लागली, ती योगायोगाने! जोशी यांनी नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कुलमधून सैनिक प्रशिक्षण घेतले. पुढे ते एका खाजगी कंपनीत नोकरीला लागले. १९८५ रोजी परळ येथील `हाफकिन इन्स्टिट्यूट’ येथे ५४ दिवस त्यांच्या कंपूची ड्युटी लागली. कामगार संपावर गेले होते. तेथील सर्पालयात ड्युटी करण्यासाठी चार होमगार्ड्सची आवश्यकता होती. जोशींनी आपणहून पुढाकार घेतला आणि आपल्यासह आणखी

maitra-3चार जणांची ड्युटी तिथे लावून घेतली.

होमगार्ड्सना सलामी देत सर्पालयात स्वागताला सज्ज होते, ७७ कोब्रा, ११० मण्यारी, ८० घोणस, ७० फुरशी , ५०० विंचू! या सर्वांना भक्ष्य पुरवणे, ही होती होमगार्ड्सची ड्युटी. हे म्हणजे, प्रत्यक्ष मृत्यूला आवाहन देण्यासारखे होते. सर्पालयाचे प्रशासकीय अधिकारी ठाकरे सर ह्यांनी होमगार्ड्सना त्यांचे काम समजावून दिले. जोशींसह त्यांचे सहकारी सापांना उंदरांची मेजवानी देऊ लागले. परंतु एक दिवस एका पिंजऱ्यात उंदिर सोडताना चालाखीने एक ब्लॅक कोब्रा पिंजऱ्याबाहेर निसटला. त्याच्या पाठोपाठ पिंजऱ्यातला दुसरा नागही बाहेर पडला. होमगार्ड्सची पळता भुई थोडी झाली. त्यांनी सर्पालयाबाहेर पडून दार लावून घेतले.

त्याचदरम्यान सर्पालयप्रमुख डॉ. नीलकंठ वाड हाफकिन येथे सर्वेक्षणासाठी आले होते. संबंधित बाब कळताच त्यांनी हातात हुकस्टिक (टाँग) घेत सर्पालयात प्रवेश केला आणि काही क्षणांच्या आत दोन्ही नागांना जेरबंद केले. ते पाहून जोशी यांच्या मनात सर्पअभ्यासाविषयी प्रचंड कुतुहल निर्माण झाले. सर्पालयातील रोजचा वावर त्यांना सर्पजगताकडे आकर्षित करू लागला. ड्युटी अवर्स संपल्यावर तिथल्या ग्रंथालयात जाऊन जोशींनी सर्प विषयावर देशोदेशीची पुस्तके वाचली. ठाकरे सरांकडून माहिती घेत आपल्या ज्ञानात भर टाकली. अशा रितीने ५४ दिवसांची ड्युटी संपवून ते तिथून आपला मुक्काम हलवणार, तोच ठाकरे सरांनी जोशींना हाफकीन संस्थेत सर्पविषयक प्राथमिक प्रशिक्षण दिले. त्यानंतर जोशींनी चेन्नई येथील सर्पालयात सर्पविषयक प्रगत प्रशिक्षण घेतले.

प्रगत प्रशिक्षण झाल्यावर जोशी मानवी वस्तीत निघालेले सर्प सुरक्षित पकडून घरी पिंजऱ्यात ठेवू लागले. परंतु, सापांच्या भीतीने त्यांच्या घरचे घाबरले साप घरी असल्यावर पाहुणे कसे येणार? लग्न ठरण्यातही अडचणी येऊ लागल्या. त्यासंबंधित गमतीदार आठवणी जोशी सांगतात…

‘दूरदर्शनवरील ‘आमची माती आमची माणसे’ कार्यक्रमात माझी मुलाखत झाली. ती पाहून एका मुलीचे स्थळ सांगून आले. ती येण्याआधी सर्व खोल्यांतील सर्प गोळा करून मी पिंजऱ्यात ठेवले आणि ते पिंजरे हॉलमधील दरवाज्यामागे सुरक्षित ठेवले. माझ्या नकळत एक साप मोकळा सुटून पडद्यावर रेंगाळत होता. बहुतेक तोही माझ्यावतीने वधूपरीक्षा घेत होता. मुलीकडचे आले. गप्पा झाल्या. पुढची बोलणी होणार, तोच त्यांचे लक्ष पडद्यामागून आत-बाहेर मान काढून पाहणाऱ्या सापाकडे गेले. ते उठून जे निघाले, तो मागे वळून पाहण्याची किंवा नकार कळवण्याचीही त्यांनी तसदी घेतली नाही.

नंतर जे स्थळ आले, त्या मुलीने बाकी सगळे मान्य, पण घरात साप नको, अशी अट घातली. काही काळ छंद बाजूला ठेवून मी आयुष्याला प्राधान्य दिले. सगळे साप जंगलात सोडून आलो. लग्न झाले. पुन्हा साप माझ्या ओढीने आले. त्यानंतर बऱ्याच समस्या निर्माण होऊ लागल्या. ती माहेरी जाऊ लागली. सापांची रवानगी केल्यावर ती परतु लागली. हळूहळू तिलाही सापांची ओळख करून दिली. माझा शैक्षणिक हेतू, सर्पहत्या आणि सर्पदोषाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी मी सर्प घरी आणत असल्याचे सांगितले. मग तिनेही माझ्याबरोबर दीड हजार सर्पप्रशिक्षणाचे कार्यक्रम केले.”

आयुष्यातले हे स्थित्यंतर अनुभवत असताना, महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातरतर्फे त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्यातील अतिदुर्गम भागात सर्पप्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली. १९८० पासून आजपर्यंत त्यांनी १,५०,००० आदिवासी, वनवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि भारतीय सैन्यातील अधिकारी आणि जवानांना सर्पविषयक शास्त्रीय माहिती दिली आहे.

असेच एकदा अमरावतीत सर्पविषयक कामाला एका शेतातून जात असताना त्यांना एक शेतकरी दिसला. तो शेतकामात मग्न होता. चौकशी केल्यावर लक्षात आले, की तो शेतकरी अंध होता आणि तो आपल्या पत्नीला शेतीकामात मदत करत होता. त्याला पाहिल्यावर जोशींनी विचार केला, शेतात सापांचा वावर नेहमीच असतो. अशा वेळी एखाद्या अंध व्यक्तीला सापाचा अंदाज घेता आला नाही आणि चुकून सापावर त्याचा पाय पडला, तर त्याचा जीव जाऊ शकतो. म्हणून डोळस व्यक्तीबरोबरच अंध व्यक्तीलाही सर्पविषयक शास्त्रीय माहिती गरजेची आहे. ही निकड लक्षात घेऊन त्यांनी ब्रेल लिपी शिकून घेतली. १९९० रोजी अंध लोकांना कळेल अशी माहिती `सर्पस्पर्श’ नावाच्या पुस्तिकेतून प्रकाशित केली. या ब्रेल पुस्तिकेचे प्रकाशन औरंगाबाद येथील सुमारे ५०० सर्पमित्रांच्या संमेलनात महाराष्ट्र शासनाचे वनमंत्री दादासाहेब पाचपुते यांच्या हस्ते झाले. सदर पुस्तिका वाचून एका अंध वाचकाने फोन करून जोशींचे अभिनंदन केले व म्हणाले, `ही माहिती इतकी सहज, सुंदर मांडलेली आहे, की एखाद्या डोळस व्यक्तीला सर्पदंश झाला, तर अंध व्यक्तीदेखील डोळस व्यक्तीला प्रथमोपचार देऊ शकेल.’ या घटनेमुळे जोशींचा सर्पमित्राबरोबरच अंधमित्र म्हणून प्रवास सुरू झाला.

जोशी यांच्या ब्रेल साहित्य निर्मितीलाही आता २० वर्षे पूर्ण झाली. या कारकिर्दीत त्यांनी आणखीनही १२ पुस्तिकांची निर्मिती केली. `आपत्कालीन व्यवस्थापन’ या पुस्तिकेत आग, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ल्यात अंधबांधवांनी करावयाचे स्व-संरक्षण तसेच `एके-४७’ रायफलची माहिती ठिपक्यांच्या सहाय्याने पुस्तिकेत दिली आहे. तर `योगस्पर्श’ पुस्तिकेत योगासनांची माहिती आणि `हरित पर्यावरण दर्शन’ या पुस्तिकेत पर्यावरणाचे महत्त्व दिले आहे. सदर पुस्तिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पोलिस महासंचालक अरविंद इनामदार, भा. ई. नगराळे, यशवंत जोशी, माधव घुले, मुकुंद बापट, तृष्णा विश्वासराव अशा मान्यवरांनी शुभेच्छा संदेश दिले आहेत.

जोशी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांची माहिती देणारी ब्रेल पुस्तिका केली आहे. २ जानेवारी २०१९ रोजी स्वामींच्या जन्मोत्सवानिमित्त पावस येथे त्या पुस्तिकेचे अनावरण केले जाणार आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषणमुक्त विभागातर्फे `प्लॅस्टिकबंदी’ या ब्रेल पुस्तिकेच्या निर्मितीचेही काम सुरू आहे.

maitra-1

हा सगळा अनुभव गाठीशी बांधून जोशी यांनी यंदा एक अभिनव उपक्रम राबवला. तो म्हणजे अंधांसाठी दिवाळी अंक! तोही फक्त २० रुपयांत! त्यात मनोरंजनाबरोबरच अंधांसाठी बस, ट्रेन आणि इतर सामाजिक सुविधांची एकगठ्ठा माहितीही दिली आहे. त्यामुळे हा अंक संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे.

सदर अंकाच्या ५०० प्रति काढल्या आहेत. डोळस वाचकांनी भेट देण्यासाठी, तर दिव्यांग वाचकांनी साहित्याचा आनंद घेण्यासाठी या दिवाळी अंकाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन भरत जोशी यांनी केले आहे. संविधानाच्या कलम १२९ आणि १३० नुसार दिवाळी अंकांचा संच आपण विकत आणून पोस्टाकडे सुपूर्द केल्यास ते ब्रेल साहित्य अंध शाळांना, महाविद्यालयांना टपालखर्चाशिवाय पाठवता येते. मग साहित्यदानाची ही संधी आपण का दवडावी?

ब्रेल लिपीत तयार केलेल्या या दिवाळी अंकात दिव्यांगांसाठी आवश्यक अशा सर्व विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. जसे की, अंध बांधवांच्या समस्या, त्यांची ज्ञानप्रकाशाकडे झेप, अंधत्वावर मात, मानसिक शक्तीचा विकास इ. गोष्टी सोदाहरण मांडल्या आहेत. शासकीय अंध विद्यालयाचे सेवानिवृत्त अधिक्षक काशीराम महाजन सर, शिक्षिका माया पारेख, नागपुरयेथील अंधशाळेचे शिक्षक त्र्यंबक मोकासरे यांचे विशेष लेख आणि कविता अंकात समाविष्ट केल्या आहेत.

दिवाळीचा आनंद घेत असताना अंध बांधवांनी फटाक्यांपासून स्वत:चा बचाव कसा करावा, याचीही माहिती दिली आहे. एवढेच नाही, तर इतर दिवाळी अंकांप्रमाणे खाद्यपदार्थांच्या पाककृतीही दिल्या आहेत. त्यामुळे दिव्यांगांसाठी हा परिपूर्ण साहित्य फराळ ठरणार आहे.

एवढे सगळे उपक्रम हाताळत असताना जोशी लहान मुलांसाठी सुटीत सैनिक प्रशिक्षणाची शिबिरे घेतात. त्या शिबिरात मुलांना घोडेस्वारी, नेमबाजी, धनुर्विद्या, स्व-संरक्षण यांचे प्रशिक्षण तसेच भारतीय संरक्षण दलाची माहिती देतात. डोळस आणि अंध मुलांना प्रशिक्षण देता देता जोशी यांनी २०१५ मध्ये कर्णबधिर शाळेतील स्काऊट आणि गाईड विद्याथ्र्यांच्या पथकाकडून महाराष्ट्र शासनाच्या प्रजासत्ताक दिनी परेड करवून घेतली. महिनाभराच्या सरावावर त्यांनी केवळ बोटांच्या इशाऱ्यावर विद्यार्थ्यांकडून यशस्वी संचलन करवून घेतले.

जोशी यांनी आजवर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. असे राष्ट्रकार्य करता करता त्यांना दोनदा सबंध महाराष्ट्र फिरण्याची, तसेच परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. जपानच्या दौऱ्यावर असताना त्यांनी त्सुनामीची माहिती ब्रेल लिपीत शब्दबद्ध करून तिथल्या शाळांना शैक्षणिक भेट म्हणून दिली. त्यांच्या उपक्रमाचे जपानच्या शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केले. `जे आम्हाला सुचले नाही, ते तुम्ही करून दाखवले.’ अशा शब्दांत जोशी यांचे आभार मानले.
आयुष्याचे सिंहावलोकन करताना जोशी समाधानी आहेत. तरी शांत नाही. दरदिवशी नवनव्या कल्पना त्यांच्या डोक्यात जन्म घेतात आणि कालांतराने प्रत्यक्षात येतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच त्यांना सर्पमित्र, अंधमित्रच नव्हे तर जगन्मित्र अशी उपाधी द्यावीशी वाटते. (संपर्क : ९२२१५८०८८८)