
केंद्रीय निवडणूक आयोगाने धक्कादायक निर्णय घेत शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याने महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. शिवसैनिकांमधून आणि शिवसेनाप्रेमी जनतेतून आयोगाच्या निर्णयावर चीड व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेवर असे कितीही आघात केले तरी शिवसेना मागे हटणार नाही. शिवसैनिक जिद्दीने पेटून उठला आहे. त्याचे रक्त उसळले आहे. याच जिद्दीच्या जोरावर शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक जिंकणारच, असा निर्धार अनेक शिवसैनिकांनी बोलून दाखवला आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याचे वृत्त येताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. निवडणूक आयोगाने शिवसेनेला बाजू मांडण्याची संधी न देता केवळ एक बैठक घेऊन आपला निर्णय दिल्याने त्यावरून शिवसैनिकांनी तीव्र शब्दांत चीड व्यक्त केली. आयोग कोणाच्या दबावाखाली आणि इशाऱ्याने काम करत आहे, असा सवाल शिवसैनिकांनी विचारला. ‘देशात हुकूमशाहीची चिन्हे दिसत आहेत’, ‘निवडणूक आयोगाने मालकाशी इमान राखत निर्णय दिला’, 2024च्या निवडणुकीत मतदाराला भाजप आणि लोकशाही यातील एक काहीतरी निवडावे लागेल, ‘सत्य परेशान हो सकता है, परास्त नही’, अशा तिखट प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून उमटल्या आहेत.
निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीचा मुडदा पाडणारा आहे. या निर्णयाने सर्वत्र चीड आणि संताप निर्माण झाला असून अंधेरीच्या पोटनिवडणुकीसह येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदानातून ही चीड व्यक्त करत गद्दार आणि त्यांचा बोलविता धनी असलेल्या भाजपला धडा शिकवण्याचा निर्धारच अनेक शिवसैनिकांनी केला आहे. ही आग विझवू देऊ नका. आता आपल्याला पूर्ण ताकदीने लढायचे आहे. बदला घ्यायचा आहे, अशी जिद्दही कडवट शिवसैनिकांनी व्यक्त केली.
गद्दारांनो, कुठे फेडाल हे पाप?
खोकेवाल्या गद्दारांमुळे शिवसेनेचे चिन्ह गोठवले गेले आहे. त्यावरून निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना खडेबोल सुनावले. गद्दारांनो कुठे फेडाल हे पाप?, असा सवालच अनेक शिवसैनिकांनी विचारला. गद्दारांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. त्यांनी जे पाप केले आहे त्याचा हिशेब येथेच होणार आहे. रक्ताचे पाणी करून आम्ही गद्दारांना धडा शिकवू, असेही शिवसैनिकांनी निक्षून सांगितले.































































