अभिनेत्याच्या घरी चोरी करणारा नोकर गजाआड, चोरी करण्यापूर्वी दिले सरबत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडच्या एका अभिनेत्याच्या घरी चोरी करून पळालेल्या नोकराला अखेर ओशिवरा पोलिसांनी अटक केली. नंदू ऊर्फ नरेंद्र बाबूलाल गमेथी असे त्याचे नाव आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

तक्रारदार हे अभिनेते असून ते ओशिवरा परिसरात राहतात. त्याच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून नरेंद्र हा घरकामाला होता. गेल्या महिन्यात तक्रारदार हे त्याच्या पत्नीसोबत दुबई येथे गेले होते. तेव्हा तक्रारदार याची मुलगी घरात एकटीच होती. चोरी करण्यापूर्वी नरेंद्रने त्या मुलीला सरबत प्यायला दिले. सरबत प्यायल्याने मुलीला गुंगी आली. त्यानंतर नरेंद्रने घरातून जुन्या दारूच्या बाटल्या, जुने बूट, सोन्याचे दागिने घेतले. त्या तीन बॅग घेऊन तो खाली आला. त्याने तक्रारदार याची गाडी घेऊन तो अंधेरी येथे गेला.

नरेंद्रला गाडी चालवता येत नसल्याने त्याने अंधेरी येथे गाडी ठोकली. पोलीस पकडतील म्हणून त्याने बॅगा गाडीतच टाकून पळ काढला. दुसऱया दिवशी तक्रारदार याची मुलगी झोपेतून उठली तेव्हा चोरीचा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने याची माहिती तक्रारदार यांना दिली. तक्रारदार हे दुबईहून मुंबईत आल्यावर चोरीची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात दिली. ओशिवरा पोलिसांनी नरेंद्रविरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक मनोहर धनावडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन जाधवर, सहायक निरीक्षक आनंद नागराळ, खैरे, सोयंके, गिते आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही पॅमेऱयाची तपासणी केली. तेव्हा पोलिसांना चोरीला गेलेली गाडी अंधेरी परिसरात आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी नरेंद्रची माहिती काढली. नागराळ यांचे पथक राजस्थान येथे गेले. पोलिसांनी नरेंद्रच्या आजीची चौकशी केली. चौकशीदरम्यान नरेंद्र हा अहमदाबाद येथे असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. तेथून पोलिसांनी नरेंद्रला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर नरेंद्रने चोरीची कबुली दिली.