
>>राज चिंचणकर
कलाजीवनातली एक हृदयस्पर्शी आठवण
जागवत आहेत, ज्येष्ठ रंगकर्मी विजय गोखले…
कलाजीवनाच्या प्रवासात अनेक प्रसंग कलाकाराच्या जीवनावर संस्कार करून जातात. सन 1980 नंतर बाळ कोल्हटकर यांच्या ‘रॉबिनहूड’ या बालनाटय़ात मी काम करत होतो. त्यातली भूमिका बघून त्यांच्या मनात आले की, मला एखादी विनोदी भूमिका द्यावी. त्यानुसार ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातली गाजलेली ‘बाळू आपटे’ ही भूमिका मी उत्तम करेन असे त्यांना वाटले. पण त्यावेळी भाबडेपणाने मी बोलून बसलो की, मला या नाटकातली ‘सुभाष’ ही भूमिका करायची इच्छा आहे. कवीवृत्ती, पापभीरुपणा, भाबडेपणा, संवेदनशीलता, बिनधास्तपणा असे विविध रंग या भूमिकेत आहेत.
मी नेहमी गमतीने म्हणतो की, ‘सुभाष’ची भूमिका केल्यानंतर माझ्या आजवरच्या आयुष्यामध्ये इतर कुठलीही भूमिका मी केली नसती तरीसुद्धा एक कलाकार म्हणून मी भरून पावलो असतो. सांगायची गोष्ट अशी की, या नाटकातली बाळ कोल्हटकर यांनी गाजवलेली ही भूमिका माझ्या वाटय़ाला आली. बाळासाहेबांची नाटके प्रचंड लोकप्रिय होती. आमचे वडील विद्याधर गोखले तर नेहमी म्हणायचे की, ‘‘मी नाटक लिहितो, कानेटकर लिहितात. परंतु प्रेक्षकांची नाडी कळलेला नाटककार एकच आणि तो म्हणजे बाळ कोल्हटकर.’’ त्यांची नाटके सुसंस्कारी होती. त्यामुळे त्यांच्या नाटकांचे महाराष्ट्रभर हजारो प्रयोग झाले.
आमच्या या नाटकाचा एकदा कणकवलीमध्ये प्रयोग होता. ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो,’ हा या नाटकाचा गाभा आहे. चुकीच्या मार्गाला लागलेल्या एका व्यक्तीला सुधारण्याची इच्छा आहे. परंतु तसे घडत नाही असे ते पात्र आहे, तर आमचा हा प्रयोग संपला आणि आम्ही लॉजवर आलो. काही वेळातच आमच्या कपडेपटवाल्याने माझ्या खोलीचे दार वाजवले आणि तो म्हणाला, ‘‘बाहेर तीन माणसे आली आहेत आणि ती ऐकायला तयारच नाहीत. त्यांना तुम्हाला भेटायचेच आहे.’’ मी बाहेर आलो आणि पाहिले तर त्यांचे चेहरे रडवेले झाले होते. त्यातल्या गृहस्थांसोबत आलेली त्यांची दोन्ही मुले जीवनात चुकीच्या मार्गाला लागली होती, पण त्या दिवशी त्यांनी आमचा प्रयोग बघितला आणि ती मुले अगदी ढसाढसा रडायला लागली होती. ते गृहस्थ मला म्हणाले, ‘‘अगदी देव हातात घेऊन मुलांनी शपथा घेतल्या आहेत की, यापुढे आयुष्यात ते कधी चुकीचे वागणार नाहीत. यापुढे प्रामाणिकपणे जगणार आणि त्रास होईल असे वर्तन त्यांच्याकडून कधीही घडणार नाही.’’ त्या गृहस्थांनी त्या मुलांना माझ्या पाया पडायला लावले. त्या भूमिकेला आणि बाळासाहेबांच्या लेखणीला मिळालेला तो सलाम होता.
थोडय़ा वेळाने भानावर आल्यावर माझ्या लक्षात आले की, आपण कलेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करत आहोत आणि आमच्या नाटकाने म्हणजेच कलेने दोन जिवांना मार्गी लावले होते. मग असे कितीतरी जीव चांगल्या मार्गाला लागत असतील आणि इतर मार्गाची जी कला आहे ती कितीतरी जिवांना बिघडवत असेल. तेव्हा मला असे वाटते की, कला अश्लील नसावी, बीभत्स नसावी, समाजातल्या कोणत्याही घटकांच्या भावना दुखावणारी तर अजिबात नसावी. कलेकडे आपण खूप गांभीर्याने पाहायला हवे, याचा साक्षात्कार मला त्यावेळी रंगदेवतेने आणि नटेश्वराने करून दिला. जी भूमिका तुम्हाला मिळते ती प्रामाणिकपणे करायला हवी. कारण प्रेक्षक एका वेगळय़ा दृष्टीने तुमच्याकडे पाहत असतो. प्रत्येकाची दृष्टी वेगळी आणि प्रत्येकाची सृष्टी वेगळी असते. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही प्रामाणिकपणे, अगदी हृदयापासून काम केले, तर नटेश्वर किंवा परमेश्वर तुमच्या पदरामध्ये यश घातल्याशिवाय राहत नाही, यावर माझी ठाम श्रद्धा आहे.




























































