देशी झाडे जगवणारी ग्रीन अम्ब्रेला

>> अनघा सावंत

वृक्ष अनेक मौलिक गोष्टी आपल्याला देतात. एका वृक्षावर मनुष्य प्राण्यासकट असंख्य जीव, जंतू, पशू, पक्षी अवलंबून असतात. ते एक प्रकारे त्यांचे छत्र असते. हे लक्षात घेऊन आमच्या संस्थेचे नाव ‘ग्रीन अम्ब्रेला’ असे ठेवले. आमच्या संस्थेची स्थापना 2010 मध्ये झाली असून मुंबईसारख्या सिमेंटच्या महानगरात प्रत्येकाच्या मनात हरित छत्र निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी भावना संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष विक्रम यंदे यांनी व्यक्त केली.

‘ग्रीन अम्ब्रेला’ केवळ झाडे लावत नाही, तर झुडपे, वेली, छोटय़ा वनस्पती, गवतांचे प्रकार यांचा स्थानिक जैवविविधतेनुसार अभ्यास करून लागवड करते. गेली 13 वर्षे संस्थेने सातत्याने या सर्व बाबींचा शास्त्राrय अभ्यास करून, बीज संकलन मोहिमा राबवून, संकलित करून रोपवाटिकेत रोपे तयार केलेली आहेत. ही रोपे स्थानिक वृक्षप्रेमी, सामाजिक संस्था, महानगरपालिका यांना अत्यल्प दरात उपलब्ध करून दिलेली आहेत. संस्था मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह शहराच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागातही जैवविविधतापूरक वृक्ष लागवड करत आहे.

‘‘कोकण, सह्याद्री, मराठवाडा, विदर्भ असे जमीन, हवामान, वातावरण याबाबतीत विविधता असणारे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. त्यानुसार त्या त्या प्रदेशात हजारो वर्षांच्या स्थित्यंतरातून, हवामान बदलातून, जडणघडण होत स्वतःमध्ये बदल घडवत आज दिसणाऱया वनस्पती, वृक्ष प्रजाती तयार झालेल्या आहेत आणि यावर अवलंबून असणारी कीटक, पक्षी, प्राणी यांची एक परिसंस्था तयार झाली आहे. परंतु त्यांचा कोणताही अभ्यास न करता आपण केवळ मिळतील ते वृक्ष, त्यातही आपल्याला उपयोगी फळझाडे लावणे म्हणजे निसर्ग संवर्धन नाही. ‘ग्रीन अम्ब्रेला’ ही केवळ झाडे लावणारी संस्था नसून परिसंस्थेचा अभ्यास करून झाडे लावणारी संस्था आहे,’’ असे विक्रम यांनी सांगितले. बीज संकलन, रोपे तयार करण्याचा उपक्रम, देशी दुर्मीळ वृक्ष परिचय सत्र हे सगळे कार्यक्रम संस्था विनामूल्य आयोजित करते. कचऱयाचे योग्य वर्गीकरण करून खत निर्मिती, प्लॅस्टिक पुनर्प्रकिया प्रकल्प असे प्रकल्प राबवते.

  •  संस्थेचा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे संस्थेने मुंबईतील प्रमुख महामार्ग असलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड ते घाटकोपर या नऊ किलोमीटरच्या पट्टय़ात रस्त्याच्या दुतर्फा फिकस प्रजातींची 3 हजार 500 रोपे लावून मोठी केली आहेत. यामागे प्रदूषण कमी करणे हा उद्देश असला तरी फिकस प्रजाती जैवविविधता जोपासणाऱया पक्षी, कीटकांना अन्न उपलब्ध करून देणाऱयाही आहेत.
  • संस्थेचा दुसरा प्रकल्प उद्यानांमध्ये स्थानिक प्रजातींचे दुर्मीळ, जैवविविधता वाढवणारे वृक्ष लावणे हा असून त्या माध्यमातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या महानगरपालिका असणाऱया शहरांच्या विविध उद्यानांमध्ये 80 हून अधिक प्रजातींचे आठ हजार दुर्मीळ वृक्ष संस्थेने लावलेले आहेत. अशा प्रकारे संस्थेने विविध उद्यानांमध्ये नक्षत्रवन, राशीवन, धार्मिक वृक्ष, रानमेवा, पक्ष्यांचे ज्यूस बार, फुलपाखरू उद्यान अशा संकल्पना राबवून वृक्षारोपण केले आहे. संस्थेचे यातील काwशल्य पाहून मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात संस्थेला 350 दुर्मीळ प्रजाती लावण्यासाठी निमंत्रित केले आहे.
  • संस्थेचा तिसरा कौतुकास्पद प्रकल्प म्हणजे वसई येथे स्वतःची स्थानिक, देशी, दुर्मिळ झाडांची नर्सरी स्थापन करून संस्थेने महत्त्वाचे पाऊल उचलेले आहे.