कोळी लोकगीतांचा बादशहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  अनुराधा परब

चिंचय यांच्यासारख्या अनेक कोळीगीतकारांनी ही कोळीगीते जगभर लोकप्रिय केली. दर्या हा फक्त कोळ्यांचा नाही तर तो सर्वांसाठी रत्नाकर आहे, हेच त्यांनी आपल्या शब्दांतून दाखवून दिलं, परंतु या गीतकारांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही, याची खंत वाटते. चिंचय यांच्या गाण्यांनी उमलत्या वयात माझ्यासारख्या अनेकांना स्वतःतील कलेला ओळखायला जणू काही मदतच केली होती. त्यांच्या जाण्याने ऐंशी- नव्वदीचं दशक कूस बदलून काही क्षणांसाठी पुन्हा समोर आलं. आम्हाला कलादृष्ट्या समृद्ध करणाऱ्या चिंचय यांना म्हणूनच ही आदरांजली.

परवाच कोळीगीतकार काशीराम चिंचय गेल्याचा मथळा वाचला. आधी काहीच विशेष जाणवलं नाही. वर्तमानपत्रामध्ये अनेकांच्या निधनवार्ता छापून येतात त्यापैकी एक असंच याहीबाबतीत झालं. कोळीगीतकार या विशेषणामुळे लक्षपूर्वक बातमी जेव्हा वाचली त्या वेळी मन झपकन 80-90 च्या दशकात गेलं.

ज्यांच्या कोळीगीतांवर आमच्या इमारतीच्या वार्षिक कार्यक्रमांत आम्ही धमाल नाचलो ते हेच कोळीगीतकार काशीराम चिंचय, हे बातमीतून कळल्यानंतर खरोखरच वाईट वाटल्याखेरीज राहिलं नाही. कोळीगीतं ही मराठी मुलखात तसा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतील. अनेक लग्नांच्या मांडवात कोळीगीतं वाजली नसतील असे सोहळे फारच थोडे असावेत. आज त्यांची जागा हिंदी चित्रपटगीतांनी घेतली असली तरी ग्रामीण भागात तर कधी शहरांतल्या गावठाणांतून आजसुद्धा हळदीचा कार्यक्रम, लग्न-वरात यामध्ये कोळीगीतं हमखास वाजतातच, इतकी क्रेझ या गाण्यांची होती, अजूनही आहे. बरं, ही गाणीसुद्धा इतकी दिलखेचक की, त्यावर पाय आपोआपच थिरकायला लागले नाहीत तर कोणतीही पैज हरायला तयार आहे. गमतीचा भाग म्हणजे लेफ्ट लेग आगे आगे, राइट लेग पिछे पिछे और मंदिर की घंटी बजाले…

लो हो गया स्टेप… इतक्या सोप्या पद्धतीने कोळीगीतांवर नाचता येते. खरे तर ही गाणी वाजायला लागल्यानंतर आपसूकच एक हात हवेत वर जात कंबर लचकवत पाय ताल धरतातच. त्यामुळे कोळीगीतांना विशिष्ट प्रकारची कोरिओग्राफी लागते हे आजचं चित्रं झालं. मुळातच कोळीवाड्यांतून राहणाऱ्या, त्यांच्या आसपासच्या आळी-वाडय़ांतून राहणाऱयांना कोण हो शिकवायला गेलं होतं कोळीनृत्य कसं करायचं ते! ती त्यांची अंगभूत अशी आनंद साजरा करण्याची संस्कृती असल्याने साहजिकच तिचा प्रभाव, परिणाम हा इतरांनीही आनंदानेच स्वीकारला.

आताच्या पालघर जिल्ह्यातलं माझं गाव. अगदी समुद्राला खेटून, त्यामुळे घराच्या ओसरीवर खेळत असताना, निवांत बसलेलो असतानासुद्धा समुद्राची गाज ऐकायला येई. आता किनाऱ्याशी अशी सलगी करणारा आगरी-कोळीवाडा हा आमचा शेजारच होता आणि आजही आहे. त्यामुळे घराच्या रस्त्यावरून उडणाऱ्या वाळूपासून ते अगदी सुक्या बोंबलाच्या आणि वेगवेगळ्या माशांच्या वासाचा गावालाच वेढा असायचा. या कोळ्यांचे आमच्याकडे तेव्हा मुहूर्त आणि अशाच काहीबाही कारणांसाठी येणे होत असे. त्यामुळे त्यांचा विशिष्ट पारंपरिक पेहराव, त्यांच्या बोलण्यातला हेल, आपुलकी व्यक्त करण्याची तऱ्हा असं बरंच काही मन टिपकागदाप्रमाणे टिपून घेत होतं नकळत. त्यांचे माशांचे व्यवहार, मासेमारीसाठीची जाळी, किनाऱ्यावर बांबूचे खांब रोवून सुकत घातलेले मासे, वाळूतच पसरून दिलेली कोलंबी, सुकट असं काहीबाही चुकवत आमचे समुद्रावर खेळ चाललेले असायचे. माशांचे काटे तर इतके इतस्ततः विखुरलेले असायचे की, त्यांना काही बोलायची सोयच नसायची. दर्याची ही दौलत तर त्यांचीच होती, त्यावरच तर त्यांची गुजराण असल्याने बोलूनही फायदा नव्हता. आम्हा मुलांमधील कुणी मोठा याबाबत तिथल्या कोळी बांधवाला, काकी ताईला काही म्हणालाच तर शंभरी भरलीच समजायची. अशा एकाहून एक इरसाल शिव्यांची सरबत्ती ऐकून घ्यावी लागायची की कान धन्य धन्य व्हायचे. नंतर ज्याने शिव्या खाल्ल्या त्याची उडालेली भंबेरी ऐकत पोट फुटेस्तोवर हसणे हा भाग आणखीनच गमतीचा होता.

एकूणच काय तर, असा आमचा गावचा हा शेजार एकदम भारी होता. सणासुदीला पारंपरिक कपडे, दागदागिने घातलेले हे स्त्री-पुरुष इतके देखणे दिसत की, आपणही तसा पेहराव करावा असा मोह होई. त्यांच्याकडील लग्नांची निमंत्रणं येत त्या वेळी तर तिकडला माहोल हा फारच पाहण्यासारखा असे. या सगळ्याची कधीही न पुसता येणारी छाप माझ्या मनावर कायम कोरली गेली होती. एकाच ठिकाणी राहून वेगवेगळ्या संस्कृती तुम्हाला अबोध वयात पाहायला, अनुभवायला मिळणं यापरतं दुसरं भाग्य नाही. या गोष्टी नकळतपणे तुम्हाला तुमचंच जगणं अधिकाधिक समृद्ध कसं जगता येईल, हे शिकवत असतात असं वाटतं. अर्थात, हे नंतरच्या काळात लागलेले अर्थ असतात. याचाच उपयोग मुंबईत राहणाऱ्या माझ्यासारख्या कित्येकांना आपापल्या परिसरात, शाळेत होणाऱ्या वार्षिक कार्यक्रमांसाठी झाला असेल.

आमच्या इमारतीमध्ये दरवर्षी 26 जानेवारी रोजी सत्यनारायणाची पूजा घातली जाण्याचा प्रघात होता. या पूजेला मुलांच्या गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला जोड मिळाली. यामध्ये नाच, गाणी, नाट्यप्रवेश, स्कीटस्, फॅन्सीड्रेस आणि खेळांच्या स्पर्धा यांचा समावेश असे. पैकी कोळीनृत्य माझ्या खास आवडीचं म्हणून नृत्याचे कार्यक्रम बसविण्याची जबाबदारी मीहून अंगावर घेतली. शाळकरी वयातल्या मला नृत्याच्या अमूक अशा स्टेप्स असतात वगैरे याची जाण नव्हतीच, तरीही कुठेतरी ती गाणी ऐकतानाच त्यातल्या नाचाची दृश्यं ही समोर साकार व्हायची. त्याप्रमाणे माझ्या वयाच्या, लहान मोठ्या अशा मुलामुलींना घेऊन किमान तीन ते चार कोळीनृत्य ही दरवर्षी मी अगदी कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत बसवली.

कार्यक्रमापूर्वी फक्त आठवडाभर संध्याकाळी शाळा संपल्यानंतर तालमी करून हे कार्यक्रम सादर व्हायचे. ‘डोल डोलतंय वाऱयावं बाय माजे’, ‘हिच काय गो गोरी गोरी पोरी नि’, ‘डोंगराचे आरून एक बाई चांद उंगवला’, ‘पारू गो पारू वेसावचे पारू’… अशी किती गाणी सांगू… या प्रत्येक गाण्यामधलं जग माझ्या अनुभवांचा एक भाग होतं. त्यांच्या गाण्यातले शब्द हे अगदी परिचयाचे होते, घरातले होते.

वेसावकर आणि मंडळींच्या कोळीगीतांच्या तेव्हा भरपूर कॅसेट्स व्हीनस रेकॉर्ड कंपनीने त्या दशकभरात प्रकाशित केल्या होत्या. त्याच कॅसेटच्या मागे गीतकारांच्या नावाकडे कितीजणांचं लक्ष गेलं असेल कुणास ठाऊक. ‘या गो दांड्यावरनं बोलतंय नवरा’, ‘मी हाय कोली सुरिल्या’, ‘एकवीरा आई तू डोंगरावरी’, ‘आई माझी कोनाला पावली’, ‘गोमू तुझे नादानं गो’, ‘आम्ही हांव जातीचे कोली’… अशा अनेक कोळीगाण्यांवर धमाल कार्यक्रम केले. इमारतीतल्या लोकांची वाहवाई, बक्षिसे मिळवली, मात्र त्या बक्षिसांचे खरे मानकरी काशीराम चिंचय यांसारखे गीतकार होते, हे आज म्हणावंस वाटतं. चिंचय यांच्यासारख्या अनेक कोळीगीतकारांनी ही कोळीगीते जगभर लोकप्रिय केली. दर्या हा फक्त कोळ्यांचा नाही तर तो सर्वांसाठी रत्नाकर आहे, हेच त्यांनी आपल्या शब्दांतून दाखवून दिलं, परंतु या गीतकारांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही, याची खंत वाटते.

चिंचय यांच्या गाण्यांनी उमलत्या वयात माझ्यासारख्या अनेकांना स्वतःतील कलेला ओळखायला जणू काही मदतच केली होती. त्यांच्या जाण्याने ऐंशी नव्वदीचं दशक कूस बदलून काही क्षणांसाठी पुन्हा समोर आलं. आम्हांला कलादृष्ट्या समृद्ध करणाऱ्या चिंचय यांना म्हणूनच ही आदरांजली.

[email protected]