हसता हसता अंतर्मुखता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>>अरविंद दोडे

दीडदमडी राजकीय’ लेखांचा हा संग्रह म्हणजे निर्मळ विचारांचा हसरा ठेवा आहे. एकूण 38 स्फूट लेख म्हणजे खडूस माणसालाही प्रसन्न करणारा नजराणा आहे. सतत सुतकी चेहऱ्याने वावरणारे काही लोक हे ‘हसाल तर याद राखा’ हा नियम सरकारी हुकूमावरून निष्ठेने पाळतात आणि दुर्मुखतेकडून ‘वाहव्वा’ मिळवण्यात धन्यता मानतात. अशा लोकांना ‘विनोद’ म्हणजे ‘महापाप’ असेही वाटते. त्यांच्या करुण आणि उदासीन चित्तवृत्ती बदलण्याची शक्ती तंबी दुराई यांच्या जबरदस्त लेखनात आहे. प्रस्तुत संग्रहात दोन विभाग आहेत. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय लेखन असून काही स्फूट लेख प्रासंगित आहेत, तर काही चिरकालिक आहेत. हिंदुस्थानातील राजकारणी लेखकास कायम विविध विषय पुरवत असतात. त्यामुळे अशा लेखनाला अंत नाही. त्यातही दीडदमडीच्या बुद्धिमान लोकांची वर्षानुवर्षे अन् पिढय़ान् पिढय़ा चलती आहे, हे जनतेला ठाऊक आहे. सामान्यजनांचा राग विनोदाच्या रंगात रंगवून मजा आणली आहे.

‘मनमोहन सिंग लापता’, ‘तू आणि मी अमर आहोत’, ‘अर्ध्या चड्डीचे स्वागत’ अशा काही शीर्षकावरून विषयाची व्याप्ती कळते. हसता हसता अंतर्मुख करणाऱ्यासंग्रहाची एकंदर प्रकृती वाचकाची तब्येत खूश करण्यास समर्थ आहे. यात निवेदन आहेत. पत्रे आहेत. खुशखुशीत संवाद आहेत. याशिवाय विनोदासाठी आवश्यक ती अतिशयोक्ती, असंगती, अज्ञान, अविश्वास वगैरे अनेक ‘अ’ असल्याने आचार्य अत्रे म्हणतात त्याप्रमाणे सर्व दर्जेदार मसाला ठासून भरलेला आहे. (हिंदुस्थानात प्रत्येक क्षेत्रात अशी असंख्य गोदामे भरलेली आहेत.

दुसरा खंड अराजकीय असून या दुसऱ्या भागात आहेत सामाजिक, साहित्य, संस्कृती, नाटय़, काव्य, शास्त्र, विनोदावर केलेली भाष्येही गंभीर वाचकांच्या चेहऱ्यावरची माशी उडविणारी आहेत. लेखकाची व्यावसायिक कारकीर्द पाहता वृत्तपत्रीय अनुभवांची समृद्ध झालेली प्रगल्भता सहज लक्षात येते. हरामखोर, बेशरम आणि कोडग्या धनदांडग्यांवर न रागवता, त्यांची खिल्ली उडवताना फार मोठी दिलदार वृत्ती (क्षमा करण्याची) कलावंतात असावी लागते, आदर्श इमारत प्रकरण, पार्टीकल गॉडचा शोध, मंगळयान, पेपरवड्या (फालतू अहवाल) वगैरे गाजलेल्या गोष्टी झकास जमल्या आहेत.

गोहत्याबंदी आणि म्हशीचे दुःख, साहित्य संमेलन आणि वार्षिक वाद, पुस्तकांविषयीचे अधिकार, महाराष्ट्र सदन (दिल्ली), साहित्य अकादमीचा (धक्कादायक) पुरस्कार अशा सतत चर्चेच्या मैदानात रंगणाऱ्या गोष्टी. त्या हसऱ्या गॅलरीत मांडताना लेखकाने झकास खुलवल्या आहेत. यामागे अनेकांचे सहकार्य लाभले आहे. अप्रत्यक्षपणे राजकारणातील महान नेते, साहित्य क्षेत्रातील अभिनेते, अभिनय जगतातील साहित्यिक, काव्यविडंबन, सारे काही आहे. गेल्या दहा हजार वर्षांत असे टीकास्वयंवर आपल्याला विनोदाच्या शुभकार्यालयातील उत्तम मेजवानी देणारे आहे. ‘रोहन प्रकाशना’च्या अभ्यासपूर्ण आशयघन पुस्तकांच्या यादीत विनोदग्रंथही शोभून दिसतात, त्याचा हा पुरावा. प्रभाकर बागले यांची अप्रतिम प्रस्तावना या पुस्तकांचे वजन वाढविणारी आहे.

दीड-दमडी राजकीय/दीड-दमडी अराजकीय
लेखक : तंबी दुराई
प्रकाशक  :  रोहन प्रकाशन, पुणे 30
पृष्ठ 156/167, मूल्य : रुपये 175/-