अभिप्राय : अध्यात्माची सहजसुंदर गुंफण

>> अस्मिता येंडे

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अस्थिरता दिसून येते. प्रपंच करण्यासाठी, अर्थासाठी मनुष्य धावपळ करतो आहे. जीवनाला अर्थ देण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे काम अध्यात्म करत असते. अध्यात्म म्हणजे परमेश्वराशी संवाद साधण्याची संधी.

शारीरिक स्वास्थ्य सुदृढ असले म्हणजे मनुष्य निरोगी आहे, असे नाही. शरीरासोबतच मनाचे स्वास्थ्य जपणे ही तितकेच महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारे पुस्तक म्हणजे डॉ. गौरी जोशी लिखित ‘ट्रंककॉल टू कृष्णा’ पुस्तकाच्या शीर्षकात ‘कृष्णात’ हा शब्द वाचल्यानंतर वाचकांच्या मनात त्याचे सुंदर, निरागस रूप उभे राहते आणि सुरू होतो कृष्णमय प्रवास. पुस्तकाच्या लेखिका डॉ. गौरी जोशी या आध्यात्मिक हिलर आहेत, ईएनटी सर्जन आहेत तसेच त्या रेकी ग्रैंडमास्टरदेखील आहेत.

आपणास माहीत आहे, भगवद्गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. ‘ट्रंककॉल टू कृष्णा’ या पुस्तकात एकूण 30 लेखांचा समावेश असून भगवद्गीतेतील मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान लेखिकेने अगदी सोप्या शब्दांत विविध उदाहरणे, कथा याद्वारे विशद केले आहे. भगवद्गीतेतील निवडक अध्याय, श्लोक, त्यांचा नेमका अर्थ सहज-सोप्या शैलीत विशद केले आहे. भगवद्गीतेतील सार, त्यातील भावार्थ आणि बदलत्या जीवनशैलीमुळे जगण्याचे बदललेले संदर्भ यांची गुंफण यात अनुभवायला मिळते.

मानवी मन हे दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व असते. मन चंचल असते. विचारांचे चक्र सतत सुरू असते. कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही. प्रत्येक मनुष्यात षड़्रिपूंचा वास असतो. राग, लोभ, मत्सर, ईर्षा, मोह, मद, कामवासना या भावनांवर नियंत्रण ठेवून जीवन कसे व्यतीत करावे, याचा सोपा मार्ग या पुस्तकात सापडेल. मन एका ठिकाणी स्थिर करणे कठीण असले तरी साधनेतील सातत्याने ते शक्य आहे, हे अनेक उदाहरणांद्वारे लेखिकेने पटवून दिले आहे. बदलती जीवनशैली, त्यात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव यामुळे मनातील नैराश्य, ताण, असुरक्षितता वाढते आहे. या भौतिक सुखाच्या मागे धावताना मानसिक सौख्य कमी होत चालले आहे, याची जाणीव करून देऊन जीवन सुकर करण्यासाठी साधना, ईश्वराप्रति प्रेमभाव, समर्पण करण्याची वृत्ती जपण्याचे सहज-सोपे निरूपण म्हणजे ‘ट्रंककॉल टू कृष्णा’ हे पुस्तक.

या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांचा ट्रंककॉल श्रीकृष्णाशी जोडला जातो आणि स्वतःची स्वतःला नव्याने ओळख होते. साधी-सोपी शब्दरचना, ओघवती लेखनशैली आणि प्रवाही निवेदनशैली यामुळे पुस्तक वाचताना मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लेखिकेने सांगितलेले भगवद्गीतेतील सार आणि त्याचा आजच्या काळातील विविध समस्यांशी असणारा संबंध विचारप्रवण आहे. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी ही कार्यप्रणाली आपल्या दैनंदिन जीवनात अमलात आणायला हवी.

प्रस्तुत पुस्तकाला डॉ. मोहन आगाशे यांनी मौलिक प्रस्तावना लिहिली आहे. नितीश भारद्वाज यांनी अल्प शब्दांत पुस्तकाचे योग्य विवेचन केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ मनोज्ञा मेहेत्रे यांनी समर्पक साकारले आहे. श्रीकृष्णाने धारण केलेल्या मोरपिसामध्ये जशी विविध रंगांची आकर्षक रचना आपण पाहतो, तसेच मानवी मनाचे, वृत्तीचे विविधांगी रंग या पुस्तकात अनुभवण्यास मिळतील.

‘ट्रंककॉल टू कृष्णा’ – लेखसंग्रह
लेखक : डॉ. गौरी जोशी
प्रकाशक :  उद्वेली बुक्स
मूल्य : रुपये 200/-