मनतरंग – ‘अरे’ ला ‘का रे’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

नचिकेतला ऑफिसमध्ये त्याचा भिडस्त स्वभाव खूप त्रास देत होता. त्याचा बॉस आणि कलीग त्याच्या या स्वभावाला ओळखत असल्यामुळे त्यांनी त्याला टीकेचे आणि मस्करीचे लक्ष्य केलेले होते. त्यांना सामोरे जाण्यासाठी नचिकेतला त्यांच्या उपहासात्मक बोलण्यास गरजेपेक्षा महत्त्व न देण्यास सांगण्यात आले. या सर्वांबरोबरच त्याने स्वतःवर विश्वास ठेवणे किती गरजेचे आहे आणि स्व-प्रतिमेशी कशी ओळख करवून घ्यायची हेही त्याच्या मनावर बिंबवले गेले.

मॅडम, मला रडायला भरपूर येत असतं, पण रडू कोणासमोर? घरी बायकोसमोर काही शेअर करायचं म्हटलं तर ती सगळ्याच गोष्टी कॅज्युअली घेते. मी खरंच सांगतो, मला ऑफिसमध्ये माझ्या कलीग आणि बॉसचा त्रास होतोय. ऑफिसमध्ये मला जावंसंही वाटत नाहीये आजकाल…’’ नचिकेत (नाव बदलले आहे) पोटतिडकीने हे सर्व सांगत होता.

त्याच्या म्हणण्यानुसार त्याला ऑफिसमध्ये काही लोकांचा त्रास होता. त्याचा बॉस हा दररोज त्याच्या छोटय़ा छोटय़ा चुका काढायचा. सगळ्यांसमोर अपमानकारक बोलायचा. ऑफिसमध्ये अशी शोभा झाल्यावर नचिकेतला मग मेल्यासारखं व्हायचं. त्यातच त्याचा एक कलीग त्याची अतिशय वाईट पद्धतीने, त्याला लागेल अशी मस्करी करायचा. या सर्व कारणांमुळे नचिकेतला खूप वाईट वाटायचं. दररोज ऑफिसला जाणं हे त्याच्यासाठी उदासवाणं होऊन जायचं.

‘‘मी तडकाफडकी नोकरी नाही सोडू शकत. माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. काय करू? कसा शांत राहू? कसं सगळं सांभाळू? तुम्हीच सांगा’’ असं म्हणून तो शांत बसला.

कामाच्या ठिकाणी होणारी छळवणूक आता काही नवीन राहिलेली नाही. बऱयाच नोकऱयांच्या ठिकाणी असा शब्दच्छल सुरू असतो. एका विशिष्ट व्यक्तीला जी ऐकून घेते किंवा जी प्रतिकार करत नाही, तिला लक्ष्य केलं जातं. सुरुवातीला तिच्या कामाबद्दल केली जाणारी टीका ही नंतर नंतर त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंतही जाऊन पोहोचते. मग नंतर त्या व्यक्तीला होणारा मनस्ताप, त्रास हे सगळं पुढे ओघाने आलंच.

नचिकेत हेच सगळं सहन करत होता. त्यात भरीस भर म्हणजे त्याच्या कुटुंबातील काही समस्यांमुळे कंटाळला होता. त्याच्या आणि त्याच्या पत्नीमध्ये विसंवाद होता. त्याचे परिणाम नचिकेतवर दिसू लागले होते. कायम अस्वस्थ असणं, कारणाशिवाय अचानक वाटणारी काळजी, डोक्यात सदान्कदा घुमणारी विचारांची साखळी या सर्वांमुळे त्याच्या तब्येतीवरसुद्धा ताण आला होता. रात्रीची झोप कमी झाली होती. भुकेचीही जाणीव आताशा कमी झालेली त्याला जाणवत होती. अजून काही प्रश्न आणि अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून त्याने समुपदेशनाचा पर्याय शोधला होता.

नचिकेतसाठी ‘‘लक्ष देऊ नकोस, तू फक्त तुझं काम करत रहा’’ असे सल्ले सांगण्यासाठी सोपे, पण अवास्तविक झाले असते. म्हणूनच त्याच्यासाठी समुपदेशन प्रक्रियेत ‘व्यक्तिमत्त्व विकासा’चा समावेश करण्यात आला, जेणेकरून त्याचा गेलेला आत्मविश्वास त्याला परत मिळू शकेल. यामध्ये बरीच सत्रे घेतली गेली, ज्याद्वारे त्याच्या मनातील नेमका सल शोधला गेला.

नचिकेतला याबाबतीत बोलतं केल्यावर असं दिसून आलं की, त्याच्या शालेय जीवनात तो बराचसा भिडस्त आणि अबोल होता. त्याच्या शांतपणाचा अर्थ इतरांकडून याला काही जमत नाही असा काढला गेला. त्यानेही या त्याच्या बाबतीतल्या इतरांकडून केल्या जाणाऱया टीका अजाणतेपणी स्वीकारल्या होत्या. ‘टीका सहन करणे’ हा त्याचा स्वभाव बनत चालला होता आणि म्हणूनच तो त्याच्या पत्नीशीही मोकळा झालेला नव्हता.

नचिकेतला राग यायचा, पण तो राग त्याने आतल्या आत दाबून ठेवला होता, ज्यामुळे त्याला भरपूर त्रास होत होता, जो झोप न लागणे, भूक नसणे, डोके वारंवार दुखणे अशा स्वरूपात बाहेर येत होता. त्याला ‘राग आणि ताण या भावना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कशा व्यक्त करायच्या’ हे ‘ताण आणि रागाचे व्यवस्थापन’ या पद्धतींद्वारे शिकवले गेले.

नचिकेतला ऑफिसमध्ये त्याचा भिडस्त स्वभाव खूप त्रास देत होता. त्याचा बॉस आणि कलीग त्याच्या या स्वभावाला ओळखत असल्यामुळे त्यांनी त्याला टीकेचे आणि मस्करीचे लक्ष्य केलेले होते. त्यांना सामोरे जाण्यासाठी नचिकेतला त्यांच्या उपहासात्मक बोलण्यास गरजेपेक्षा महत्त्व न देण्यास सांगण्यात आले.

या सर्वांबरोबरच त्याने स्वतःवर विश्वास ठेवणे किती गरजेचे आहे आणि स्व-प्रतिमेशी कशी ओळख करवून घ्यायची हेही त्याच्या मनावर बिंबवले गेले.

या आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टींचे महत्त्व नचिकेतच्या लक्षात आले होते. त्याने स्वतःच्या कमजोर बाजू आता ओळखल्या होत्या आणि चांगल्या गुणांच्या संगोपनासाठी लागलीच प्रयत्न सुरू केले.

आता नचिकेतला त्याच्या ऑफिसातले दिवस सुसह्य बनत चालले होते. तसेच त्याच्या आता खंबीर बनत असलेल्या स्वभावाला त्याच्या ऑफिसमधलेही त्याचे कलीग आता ओळखू लागले होते. का नाही ओळखणार? कारण त्याने त्याच्या बॉस आणि त्रास देणाऱया कलीगची त्याच्या ‘HR department’मध्ये तक्रार दाखल केली होती. कारण ते दोघेही त्याला मानसिक त्रास देतच होते.

शेवटी तो बदलला होता. म्‘ाात्र त्याच्या ऑफिसमधल्या काही व्यक्ती बदलल्या नव्हत्या. सरतेशेवटी नचिकेतने पूर्ण विचार करून स्वतःच्या आवाक्यात येणाऱया गोष्टी करून पाहिल्या होत्या. ‘अरे’ला ‘का रे’ त्याला करावंच लागणार होतं आणि स्वतःचा विचार सुरू करणंही त्याला भागच होतं.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

[email protected]