
>> मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
आमच्याकडे कामासाठी राधाबाई रुजू झाल्या, अगदी बॉडीगार्डसह. वय वर्षे चार, गोबरे गाल, उंची दोनेक फुटांपर्यंत. आला तोच अतिशय गंभीरपणे. आता आलाय म्हटल्यावर मी आणि बायको दोघांनीही त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण याच्या तोंडावरची माशी हलायची चिन्हं दिसेनात. शेवटी मी अखेरचा प्रयत्न म्हणून त्याला एक कॅडबरी ऑफर केली. त्याने त्याकडेही लक्ष नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण डोळ्यांच्या कोपऱयातून तो पाहात असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी गुगली टाकली.
‘कॅडबरी पण नको का? बरं बाबा, ठेवतो परत खिशात.’ म्हणून खिशात ठेवायचा अभिनय केला, तेवढय़ात त्याचे चिमुकले हात समोर आले.
‘द्या!’ आणि तो गोड हसला! त्या क्षणापासून आमची दोस्ती जमली. हळूहळू तो थोडा मोकळा व्हायला लागला. आपणहून बोलायला लागला. त्याचे किंचित बोबडे बोल आम्हा दोघांनाही ऐकायला आवडायला लागले. आता ही त्याची फिरकी घ्यायला लागली, चिडवायला लागली आणि तोही कधी हसत तर कधी समजावून सांगण्याच्या आविर्भावात तिला प्रतिसाद द्यायला लागला. मी मुळातच मुखदुर्बल असल्याने माझी मजल दोन-चार वाक्यांपुढे जायची नाही. लहान मुलांबरोबर मिसळून त्यांना बोलतं करण्याचं एक तंत्र असतं, ते हिला परफेक्ट जमतं. असं असलं तरी हा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. मीही तेवढय़ापर्यंत त्याच्याशी बोलायचो. तो मला बाबा म्हणायचा आणि हिला आज्जी. ही किडनी पेशंट असल्याने आठवडय़ातून दोनदा डायलिसिसला जाते. ही नसताना हे महाशय आले की, ‘कुटं गेली आज्जी’ असं विचारतात. ‘मग आता माज्याशी कोन बोलनार?’ असं विचारून माझी पंचाईत करून टाकतो. अशा वेळी नेमकं काय करायचं हे त्याला कळायचं नाही. पण मुळातच कुशाग्रबुद्धी असलेल्या त्याने एक उपाय शोधून काढला.
‘बाबा, तुमाला भीम माहितीय का?’
‘नाही बाबा. कोण भीम?’ मी वेड पांघरले.
‘काय बाबा. येवडं बी म्हाईत नाही? तुमाला बगायचाय का?’
‘हो.’
‘मंग टीव्ही लावा.’ मी लावला. पण ही सीरियल कुठे लागते हे कुठे माहीत होतं. मग त्याने रिमोट हातात घेऊन इकडे तिकडे बटन दाबून शेवटी तिचा शोध लावलाच. ‘बाबा, आता हे कुटं लागतंय ते लक्षात ठिवा’ मी मान डोलावली.
मध्येच त्याला अभ्यासाचा झटका यायचा. त्या दिवशी एक वही आणि पेन्सिल घेऊन यायचा. मग पाढे लिहिणं, इंग्रजीची मुळाक्षरं गिरवणं चालू व्हायचं. दारात एंट्री झाली की, ‘जय श्रीराम, जय स्वामी समर्थ’चा गजर करत येणं व्हायचं. आता आमची इतकी घट्ट दोस्ती झाली होती की, एखादा दिवस तो नाही आला की आम्हाला करमेनासं व्हायला लागलं. त्याने यावं म्हणून हिने एक अनिशा म्हणून पात्र उभं केलं.
‘अर्जुन, तू नाही आलास की आम्ही अनिशाचे लाड करणार, तिला चॉकलेट, बिस्किटं देणार.’
‘अनिशा लहान कुटंय. ती तर आबाळायेवडी मोट्टी हाय!’ असा त्याने दावा मांडला, पण तेव्हापासून तो नियमित यायला लागला. त्याच्या आज्जीला तो थोडा दबकायचा, पण माझ्याशी मात्र त्याची घसट वाढली होती. माझ्या अंगाखांद्यांवर त्याचं बागडणं सुरू झालं होतं.
‘बाबा, सव्वीस जानेवारीला माझा बड्डे हाय. मी तुमाला घरी नेनार.’ त्याने एकदा जाहीर केलं. आम्ही त्याच्या घरी जाऊ शकलो नाही, पण आमच्या घरी त्याचा वाढदिवस आम्ही धुमधडाक्यात साजरा केला. हे पोट्टं इतकं हुशार आहे की, रिमोटची सगळी बटनं याला पाठ. मी बातम्या वगैरे पाहत असलो की हा जवळ येणार, गोड हसून हळूच रिमोट हातात घेणार आणि सफाईने ‘पोगो’ लावून छोटा भीम पाहण्यात रंगून जाणार. मध्येच आपले गोजिरवाणे हात माझ्या गळ्यात घालणार आणि-
‘बाबा! मी पुडं छोटा भीम होनार’ ही घोषणा करणार.
या आमच्या मानलेल्या नातवाची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होवो ही त्या भीमाकडे प्रार्थना!





























































