अवलिया – रावसाहेब!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

बँकेत काम करत असताना माझा साहित्य प्रांतात किंचित शिरकाव होऊ लागला होता. तो शेवटपर्यंत किंचितच राहिला. थोडाफार लिहीत होतो, पण कामाच्या धबडग्यात तेही व्हायचे नाही. त्या वेळेच्या परभणीच्या साहित्य वर्तुळात मी क्षुल्लक होतो. नंतरही मी उंची गाठली असे काही झाले नाही. मी कुतूहलाने सगळ्या लेखकांना पाहत असे आणि एके दिवशी बातमी आली की, अखिल भारतीय साहित्य संमेलन परभणीला होणार आहे.

कुणी रावसाहेब जामकर स्वागताध्यक्ष, नारायण सुर्वे संमेलनाध्यक्ष, सनदी अधिकारी ज्यांनी नुकतेच अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे ते लक्ष्मीकांत देशमुख उपाध्यक्ष, देवीदास कुलकर्णी हे प्रमुख कार्यवाह, प्रभाकर पाठक कोषाध्यक्ष, बाकी शरद देऊळगावकर, खोडवेकर इत्यादि दिग्गज साहित्यिक यात सामील होते. आश्चर्य म्हणजे सुरुवातीची बैठक जेव्हा आयोजित केली गेली त्यात मलाही आमंत्रण होते. मला एकाच वेळी आनंद, समाधान वाटले खरे परंतु सोबत यांची काही गफलत तर झाली नाही ना या शंकेशी सामना करावा लागला. पण आनंद झाला हे मात्र खरे. या बैठकीत बऱयाच जणांची हजेरी होती आणि या सभेला अध्यक्ष म्हणून एक पहिल्याच भेटीत छाप पडणारे व्यक्तिमत्त्व होते रावसाहेब जामकर!

या बैठकीत अनेक चर्चा झाल्या. तावातावाने आपले म्हणणे मांडले गेले, पण हे गृहस्थ शांतपणे बसले होते. सगळे बोलून थकण्याच्या अवस्थेत आले, तेव्हा त्यांनी हात वर केला, तेव्हा शांतता पसरली. ‘तुमचे कार्यवाह कोण? देवीदास राव, खरं की नाय?’

सगळ्यांनी माना डोलावल्या. ‘मग जे होणार ते त्यांच्या मताने. काय?’ परत एकदा माना हलल्या.

‘चला चहापाणी घ्या आणि पुढच्या कामाला लागा!’

खल्लास… एक घाव दोन तुकडे!

इथे अ. भा. साहित्य संमेलनाचे वर्णन मला करायचे नाही, ते नंतर कधीतरी. इथे मला रावसाहेबांचे पहिले दर्शन झाले. उंचेपुरे रांगडे व्यक्तिमत्त्व. डोळ्यांत प्रचंड जरब, अंगात कायम स्टार्च केलेला पिवळा हाफ बाह्यांचा बुशशर्ट आणि पांढरी शुभ्र पँट. बोलणेही तसेच रांगडे. प्रथमदर्शनी कुणीही दबकून जावे असे. ते असे असले तरी त्यांच्या मनात कुठेतरी कणव वस्तीला असावी, कारण त्यांनी अनेकांचे कोटकल्याण केले होते. अनेक सामान्यांचे जीवन उभे करून दिले होते. या संमेलनात रावसाहेबांचा आणि माझा जवळून संबंध आला. या संमेलनाचे वैशिष्ट्य हे सांगता येईल की, याची सांगता झाल्यावर रावसाहेबांनी एकेक पैशाचा हिशोब ठेवून त्याचे नामांकित सीएकडून ऑडिट करून परभणीकरांसमोर मांडले. यासाठी आमच्या पाठककाकांनीही अतोनात परिश्रम घेतले. मला वाटतं, हे या आधीही आणि त्यानंतरही कधी झाले नसावे.
आता रावसाहेबांबरोबर माझ्या जुजबी ओळखीचे रूपांतर जवळिकेत होऊन गेले होते. अनेक पदे भूषवलेला, माजी मंत्री असलेला, समाजात दबदबा असलेला हा माणूस, आमच्यासारख्या सामान्यांशी इतक्या आपुलकीने बोलताना पाहून नवलही वाटायचे आणि स्नेहही वाटायचा. ते अनेक संस्थांचे अध्यक्ष होते, त्यामुळे कसलाही कार्पाम असला की त्यांना हमखास अध्यक्षपदाचे आमंत्रण असायचे. ते स्वत: फारसे बोलत नसत, कारण त्यांना बोलण्यापेक्षा कृती करण्यावर जास्त विश्वास होता. पुढाऱयांमध्ये इतका वक्तशीर माणूस मी प्रथमच पाहिला. एखाद्या वक्त्याचे लांबलचक भाषण चालू असले की ते कंटाळून जात आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या माझ्या कानात त्यांची रसवंती चालू व्हायची.

‘च्यायला! आपल्याला ऐकून बोअर व्हायलंय, याला बोलून कसा कंटाळा येत नसंल म्हणतो मी. जाऊ द्या, आपण गप्पा मारू.’

मला हसू यायचे. मग आमच्या हलक्या आवाजात गप्पा चालायच्या. मध्येच माझे बोलणे ऐकून ते हसायचे. ते अर्थात चाललेल्या व्याख्यानाशी विसंगत असायचे. पण रावसाहेबांना त्याची तमा नसायची. या सरळसोट माणसाला फक्त थेट कृती आवडायची, बाकीचा बोलबच्चनपणा अजिबात भावायचा नाही .

नंतर त्यांनी अनेक संमेलने घेतली, अगदी अ. भा. नाट्य संमेलन, लोकनाट्य संमेलन, एवढे प्रचंड कार्य करून हे गृहस्थ नामानिराळे. त्यांच्याजागी दुसरा कुणी पुढारी असता तर त्याने त्याचे भांडवल करून आपली झोळी भरून घेतली असती. पण यांनी वेळ पडली तर पदरमोड केली, पण कोणत्याही कारणाने कुणासमोर हात पसरला नाही. राजकारणाबद्दल सांगायचे झाले तर ते काँग्रेस पक्षाशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. त्यांचे कित्येक साथीदार त्यांना सोडून गेले, पण यांनी पक्षाची साथ सोडली नाही, याच महिन्यात त्यांचा स्मृतिदिन! त्यांच्यासाठी असंख्य हातांनी आदरांजली वाहिली असेल, त्यात माझी ही ओंजळ!
[email protected]