
>> प्राची गडकरी
संत परंपरेने भक्तीचा सोपा मार्ग आपल्याला दाखवला. देव हा माणसातच असून माणुसकी हा एकमेव धर्म खरा आहे. प्रत्येक हृदयात देव आहे, परंतु त्या हृदयावर क्रोध, लोभ, मोह, माया याची आवरणे असल्यामुळे तो परमेश्वर आपल्याला दिसत नाही. ती आवरणे काढून टाकणे म्हणजेच देवाची भक्ती हे आपल्याला संतांनी सांगितले.
संत कबीरांनी केवळ दोन ओळींत विठ्ठलाच्या मनीचे भाव आपल्या दोह्यात सांगितले आहे.
छोड दिया वैकुंठ
हरि भावभगत का भुका
कहत कबीर हरिसे मिठ्ठा
लागे तुलसी बुक्का
म्हणजे जशी भक्ताला देवाची ओढ असते तशीच देवालाही भक्ताची ओढ असतेच. म्हणून तर तो विठ्ठल वैकुंठ सोडून कैक युगे पंढरीत राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक भक्ताला विठ्ठलाच्या नावाचा टिळा, बुक्का प्राणाहून प्रिय आहे. अशा या विठ्ठलाच्या नुसत्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आजही हजारो मैल चालत आहेत हे नवल आहे. या वर्षी विठ्ठल कृपेने वारीत सहभागी होण्याचा योग मला आला आणि विठ्ठलाचे भक्त पाहून मी थक्क झाले. या आधुनिकीकरणाच्या लाटेत अशी भक्ती पाहून भारावून गेले आहे.
विठ्ठल म्हणजे सुख. विठ्ठल म्हणजे आनंदकंद. विठ्ठल म्हणजे मोक्ष, असा दृढ विश्वास भक्तगणात असल्याने हजारो वर्षांपासून ही वारीची परंपरा आजही महाराष्ट्रात चालू आहे. संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या या वारीचे आणि वारकऱयांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. काही खास नियोजन नसले तरी प्रत्येक वर्षी वारी उत्कृष्टरीत्या यशस्वी होते, हे दुसरे नवल आहे. भक्तीचा महासागर वारीच्या निमित्ताने आपल्याला पंढरीच्या वाटेवर पाहायला मिळतो. नामदेव म्हणायचे एकतरी ओवी अनुभवावी. त्याप्रमाणे प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी असे संत निळोबा म्हणायचे! वारीत कानावर येणारा माऊली हा शब्द स्वर्ग सुखाचा आनंद देऊन जातो. हजारो वर्षांपासून चालू असलेल्या या वारी परंपरेला ज्ञानदेवांनी भव्यदिव्य रूप देऊन महाराष्ट्रात भक्तीचा पाया भक्कम केला आहे.
महाराष्ट्रातल्या संत परंपरेने आपल्याला काय दिले, असे कोणी विचारल्यावर आपण पटकन म्हणू की, पाच हजार सुभाषित, सात हजार म्हणी आणि सगळय़ांत महत्त्वाचं म्हणजे याच संत परंपरेने भक्तीचा सोपा मार्ग आपल्याला दाखवला. देव हा माणसातच असून माणुसकी हा एकमेव धर्म खरा आहे. प्रत्येक हृदयात देव आहे, परंतु त्या हृदयावर क्रोध, लोभ, मोह, माया याची आवरणं असल्यामुळे तो परमेश्वर आपल्याला दिसत नाही. ती आवरणे काढून टाकणं म्हणजेच देवाची भक्ती हे आपल्याला संतांनी सांगितले.
त्या भक्तीच्या मार्गातील भाव प्रकट करण्याचा एक मुख्य मार्ग म्हणजेच वारी!
बहुत सुकृतीची जोडी
म्हणून विठ्ठली आवडी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
ज्ञानेश्वर म्हणतात, विठ्ठल आवडायलासुद्धा नशीब असावे लागते. ज्ञानेश्वरांनी क्षणोक्षणी आपल्या भक्तीतून आपलं सुदैव दाखवून दिले आहे.
ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, चोखा, गोरा कुंभार, सावत्या माळीप्रमाणे अनेक संतांनी आपल्याला भक्तिभावनेने देवाशी कसे अनुसंधान साधायचे हे सांगितले.
अर्थात या भक्तिपरंपरेत स्त्री संताचासुद्धा खूप मोठा वाटा आहे. संसार सांभाळून भक्ती कशी करायची, देवाला कसे आपलेसे करायचे, हे आपल्या कर्तृत्वाने स्त्री संतांनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
शुद्ध ज्याचा भाव झाला
देव नाही दूर त्याला
असं म्हणत मुक्ताईंनी भक्तीचा नवा मंत्र या महाराष्ट्राला दिला आहे किंवा…
बघ दळता कांडता
तुज गाईन अनंता
असं म्हणत जनाबाईंनी विठ्ठलावर अधिकार गाजवला आहे.
देव खाते देव पिते
देवावरी मी निजते
या भक्तिपरंपरेत देव आपल्या किती जवळ असतो हे जनाबाईंनी महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
नको देवराया अंत आता पाहू म्हणणाऱया संत कोन्होपात्रेस भक्तीच्या रसात न्हाऊन काढणारी वारकऱयांची वारी म्हणजेच कोन्होपात्रेस विठ्ठलाचा झालेला साक्षात्कार होय! विठ्ठलातच कृष्णाचे रूप पाहून देहभान हरपलेली संत कान्होपात्रा किंवा द्वापारयुगात उखळीला बांधलेल्या कृष्णाला केवळ अपार भक्तीपोटी कलियुगात सोडवायला गेलेल्या संत प्रेमाबाई म्हणजे वारकऱयांसाठी भक्तीचा गृहपाठ आहे.
जातीभेद न मानता लाखो कष्टकरी आपली कामे बाजूला ठेवून पांडुरंगाच्या ओढीनं आजही वारीत चालत असतात. डॉ. सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे.
वारकऱयांना मीठ-भाकरी खाऊ घालणारी संत भागूबाई किंवा टाळ-मृदंगाबरोबर वारकऱयांच्या भजनात देहभान विसरून भक्ती करता करता शेवटी विठ्ठलाच्या पायावर देह ठेवणारी संत निर्मळा म्हणजे वारकऱयांना भक्तीसाठी मिळालेली चैतन्य शक्ती आहे.
भागवत धर्माची पताका नामदेवांच्या खांद्यावर ठेवून ज्ञानेश्वरांनी समाधीच्या वेळी जेव्हा विवरात पाय ठेवला तेव्हा त्यांनी निवृत्तीनाथांच्या बरोबर नामदेवांनाही नमस्कार केला. नामदेवांकडे पाहून तृप्त मनाने स्मित हास्य केले. जणू ज्ञानेश्वरांनी त्यांच्या स्मित हास्यात भक्तीबरोबर वारीही आता सांभाळा असा संकेत तेव्हा दिला असावा. नवल म्हणजे या हृदयीचे त्या हृदयाला लगेचच कळले. म्हणूनच नामदेवांनी पुढे पंढरपुराहून पंजाबापर्यंत वारी नेली.
संत गोणाई, संत जनाबाई, लक्ष्मीबाई आणि संत राजाई यांची साथ नामदेवांना मिळाल्यामुळे कैक वर्षे भक्ती प्रचाराबरोबर वारकऱयांची सेवाही नामदेवांनी केली.
आजही वारीत नामदेवांसारखे कैक भक्त विठ्ठलाची नाही तर वारकऱयांची सेवा करण्यासाठी येतात हे विशेष आहे. वारकऱयांचे पाय चेपण्यापासून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतात. हासुद्धा भक्तीचा एक प्रकारच म्हटले पाहिजे!
आजन्म चंद्रभागेच्या तीरी साफसफाई करून भक्तांच्या सेवेत विठ्ठल पाहणारे संत गाडगे महाराज किंवा आपल्या शरीरातील तत्त्व हलकी झाल्याशिवाय खरी भक्ती होत नाही असे प्रवचनात सांगणारे संत तुकोबा यांच्या भक्तीची आजही वारीत उजळणी होते. ग्लोबल युगात वावरणारी तरुण मंडळी आणि कैक खासगी संस्था आज शासनाप्रमाणेच वारकऱयांची काळजी घेताना ठाई ठाई दिसतात. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
आयुष्य फार सुंदर आणि छोटे आहे. या छोटय़ा आयुष्यात एखाद् वर्षी जरी वारी अनुभवता आली तर त्यासारखे दुसरे सुख नाही असे मला वाटते.
– [email protected]
(लेखिक कवयित्री आणि स्त्रीसंत साहित्य अभ्यासक आहेत)





























































