जाऊ शब्दांच्या गावा – पारावरच्या गप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे, [email protected]

प्रत्येक गावात एखादं का होईना, देऊळ असतंच. त्याच्या आजूबाजूला वड, पिंपळ किंवा चिंच असं एखादं झाड असतं. त्यातल्या एखाद्या झाडाभोवती पार बांधलेला असतो. गावातला असा पार म्हणजे गावकरी जमायची जागा. हा पार गावातल्या घटनांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साक्षीदारच असतो. पण मराठीत एवढय़ाच अर्थाने ‘पार’ शब्द वापरला जात नाही, तर हा शब्द बहुअर्थी आहे.

‘पार’ शब्दाच्या अनेकार्थांची किती तरी उदाहरणं देता येतील. पैलतीर, पलीकडे, ओलांडून, आरपार किंवा मधून या अर्थाने हा शब्द अगदी सहजपणे वापरला जातो. उदा. ‘त्याने रस्ता/नदी पार केली’ किंवा ‘चाकू आरपार गेला.’ हा पार शब्द पूर्णपणे, साफ या अर्थीही वापरला जातो. उदा. चिमण्यांनी वाळवणाचे दाणे पार लांबवले. ‘पार करणे’ म्हणजे समाप्त करणं किंवा फडशा पाडणं. उदा. ‘आज एक महत्त्वाचं काम पार पडलं.’ संदर्भाने या ‘पार पडणे’चा अर्थ एखाद्या संकटातून निभावणं किंवा उरकणं असाही होतो. थोडक्यात, ‘पार’च्या पलीकडं, संपवणं, उरकणं या अर्थांमध्ये एखाद्या कार्याचा शेवट होणं हाच भाव आहे. मराठीतील हा ‘पार’ शब्द संस्कृतमधील ‘पार’ शब्दापासून आल्याचे कृ. पां. कुलकर्णी म्हणतात. मराठीशिवाय हिंदी, गुजराती, बंगाली, पंजाबी या भाषांमध्येही ‘पार’, ‘पारू’ अशी रूपं आहेत.

‘त्याच्या वागण्याला पारावार उरला नाही’ असा शब्दप्रयोग केला जातो. यातील ‘पारावार’ हा शब्दही ‘पार’च्या साखळीतलाच आहे. संस्कृतमध्ये ‘पारावार’ शब्दाचा अर्थ आहे ‘पसरणारे’. मराठीत मात्र पारावार शब्द अलीकडील व पलीकडील नदीतीर, मर्यादा, अंत किंवा शेवट या अर्थाने वापरला जातो. नदी दोन्ही तीरांच्या मध्ये पसरलेली असते. दोन तीर म्हणजे नदीच्या मर्यादारेषा किंवा अंतच जणू. त्यावरून मराठीत हा अर्थ रुढ झाला असावा. समुद्र तर अथांग पसरलेला असतो. त्यामुळे ‘समुद्र’ या अर्थानेही पारावार शब्द वापरला गेला आहे. पंडित मोरोपंतांच्या ‘मंत्ररामायणा’च्या सुंदरकांडमध्ये एक उदाहरण आहे – ‘मी पारावाराते आलो लंघूनि त्यामाजी’ अस्तमनास काठी उभी करण्यासाठी जी खाच खोदली जाते, तिलाही ‘पार’ म्हटलं जातं. अस्तमन म्हणजे जहाजात उभ्या केलेल्या डोलकाठय़ा. गलबताच्या तळास मध्यभागी चारसहा बाकांवर एक-दोन हात रुंदीचं व वीत दोन वीत जाडीचं लाकूड बसवितात. त्यात डोलकाठीचा बुंधा बसवितात. संस्कृतमध्ये तीन तासांच्या कालावधीला ‘प्रहर’ म्हटलं जातं. बोलीमध्ये त्याचं रूप ‘पार’ झालेलं पाहायला मिळतं. उदा. ‘दुपार’ म्हणजे दुसरा प्रहर. ‘सकाळच्या पारी हरिनाम बोला हो, वासुदेव आला हो वासुदेव आला.’ आता लेखाच्या शीर्षकामध्ये वापरलेल्या ‘पारा’विषयी पाहू. झाडाभोवती बांधलेला ओटा, चौथरा यांना पार म्हटलं जातं. हा पार शब्द संस्कृतमधील ‘प्राकार’ या शब्दापासून आला. प्राकृतमध्ये त्याचं रूप ‘पाआर’ झालं आणि मराठीत ‘पार’.

सावलीत निवांत बसून गप्पा मारण्यासाठी असे पार बांधले गेले असावेत. त्यामुळे गावातील चर्चा, बैठका आणि निवांत गप्पा करण्याचं ठिकाण म्हणजे पार. पूर्वी अनेक गावांमध्ये पार हा अनौपचारिक सार्वजनिक बैठकाRचं स्थळ होतं. आजही ग्रामसभा अशा पाराभोवती घेतल्या जातात. यावरून ‘पारावरच्या गप्पा’ हा शब्दप्रयोग वापरात आला. वड, पिंपळ या झाडांना धार्मिक महत्त्व असल्याने या झाडांच्या पारावर पूजा, प्रदक्षिणा किंवा धार्मिक विधी केले जातात. त्यामुळे ‘पार झिजवणे’ असा वाक्प्रचार रूढ झाला असावा. या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे – पारावरच्या झाडाच्या बुंध्यात असलेल्या देवाला किंवा पिंपळाला प्रदक्षिणा घालणं किंवा मनातला हेतू साध्य होण्यासाठी देवाला साकडं घालणं. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील बहुतांश गावांमध्ये असे पार आढळून येतात.