
>> संजीव साबडे
पराठा मूळचा पंजाबचा असला तरी कश्मीरपासून केरळपर्यंत त्याच्या बदललेल्या चवी आणि त्या त्या प्रांताचं वेगळेपण आपल्याला दिसतं.
पराठा हा एका लेखात संपणारा विषय नाही. स्टफ पराठा जसा भरगच्च असतो तसाच त्याचा आवाकाही मोठा. सध्याच्या मोसमात तो खाण्याची इच्छाही बऱयाच जणांना होते. मुंबईसह सर्व शहरांत पराठे मिळतातच. ठाण्यात असाल तर पोखरण भागातील हरी ओम पराठा हाऊसमध्ये अवश्य जा. तिथे नेहमीच्या आलू, मटर, पनीर पराठय़ांबरोबर शेझवान पराठा, चीज पिझ्झा पराठा, मशरूम-मेथी पराठा, नाचो लोडेड पराठा असे वेगळे पराठेही मस्त मिळतात. शिवाय तेथील छोले भटुरेही मस्त. वसईत नाईब सीग आण्ड पराठा हे ठिकाण भारी आहे. असंख्य प्रकारचे तंदूर व तवा पराठे, अनेक कबाब, बिर्याणी, बटर चिकन वगैरे प्रकारांवर लोक खूश असतात. विरारला खारोडी नाका, बोळींज भागातील पराठा आण्ड बिर्याणीमध्ये उत्तम पराठे तर मिळतातच, पण मक्के की रोटी, सरसो का साग, छोले भटुरे यांची चवही चांगली असते. अर्थात त्या भागात गेल्यासच तिथली चव घेता येईल. न्यू विवा कॉलेजच्या मागे पराठा डिलाईट आहे. तेही त्या भागात लोकप्रिय आहे.
मीरा रोड-भाईंदर भागात अमराठी, विशेषत उत्तर हिंदुस्थानीयांची बरीच वस्ती आहे. त्यामुळे तिथे पराठे मिळणारी अनेक रेस्टॉरंट आहेत. डोंबिवली पश्चिमेला अंबिका नगरातील मारुती मंदिराजवळ असलेल्या ओये होये पराठेमध्ये विविध 20/25 पराठय़ांबरोबर अमृतसरी कुलचेही मिळतात. इथे खिमा, बटर चिकन, चिकन चीज, चिकन शेझवान तसेच अंडा पराठाही त्यांच्या मेन्यूमध्ये आहे. महात्मा फुले रस्त्यावर, विष्णू नगरमध्ये व कॅनरा बँकेपाशी घरचा पराठा नावाचे ठिकाण आहे. डोंबिवली पूर्वेला असलेले पराठा हाऊसमधील पराठेही उत्तम असतात. कल्याणच्या खडकपाडय़ात द पराठा हाऊस बाय बीनाज किचन आहे. बिर्ला कॉलेज रोडवर पाजी पराठा नावाचे रेस्टॉरंट आहे. ते आहे नावाप्रमाणेच पुरेपूर पंजाबी. तेथील दाल माखनी, राजमा चावल, कढी पकोडा हेही पदार्थ मस्त चमचमीत असतात. सायन व तिथल्या कोळीवाडय़ाच्या म्हणजे जीटीबी नगर परिसरात शीख व पंजाबी लोकांची खूप वस्ती आहे. त्यामुळे तिथल्या रेस्टॉरंट व धाब्यात पराठे, छोले-भटुरे, कुलचे, गाजर का हलवा, पिन्नी असे पंजाबी पदार्थ हमखास मिळतात. या दिवसांत मक्याची रोटी व सरसो का साग खाणारे भरपूर. सायन कोळीवाडय़ाच्या रमेश दा ढाब्यामध्ये पराठे आलू, गोभी, पनीर यांनी खच्चून भरलेले असतात. या हंगामात मुळय़ाचे पराठेही छान लागतात. आलू-प्याज आणि लसूण यांचा पराठाही छान लागतो.
?मुंबईतील काही पंजाबी रेस्टॉरंट्स खूप प्रसिद्ध आहेत. दादरच्या पूर्वेला प्रीतम दा ढाबा, पंजाबी तडका, ग्रेट पंजाब आणि पश्चिमेला सावरकर मार्गाच्या पाटील वाडीमध्ये पंजाबी ढाबाही खूपच प्रसिद्ध व लोकप्रिय. फोर्टमध्ये शेर ए पंजाब, ओये काके, पंजाबी ग्रील आणि ग्रांट रोड येथे ओये किड्डन या रेस्टॉरंटमध्येही पराठे खावेत. बोरिवली पश्चिमेला वझिरा नाक्यावरील वर्ल्ड ऑफ पराठामध्ये इतर खमंग व चमचमीत पराठय़ांबरोबर चॉकलेट पराठा मिळतो. चॉकलेट ज्यांना आवडत असेल त्यांनीच तो खावा.
पराठा खाताना सोबत दही, पुदिन्याची चटणी व पंचरंगी आचार म्हणजे खास पंजाबी लोणचे असेल तर त्याची लज्जत वाढते. अनेकांना पराठे व लस्सी असा बेत हवा असतो. पुदिना चटणी असेल तर मस्त. सोबत छोले व राजमाच घ्यावा. त्यामुळे पराठय़ाला रसरशीतपणा येतो.अनेक खाऊगल्ल्यांतही पराठे बनवून देतात. एकवेळ तिथे खा, पण साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊन पराठा ऑर्डर करू नका. तसे करणे म्हणजे धाब्यावर जाऊन इडली व डोसा खाण्यासारखे ठरेल. हल्ली उडिपी रेस्टॉरंटमध्ये पंजाबी, चायनीज, थाई हेही मिळते, पण तिथे खावी त्यांची खासियत. केरळी रेस्टॉरंटमध्ये गेलात तर मात्र तिथे मलबारी पराठा आणि फिश करी, मटण करी किंवा अंडा करी अवश्य खा. हे मांसाहारी प्रकार आवडत व चालत नसतील तर तिथे पराठय़ाबरोबर ऑर्डर करा कडल करी म्हणजे चण्याची उसळीसारखी पातळ भाजी. ती लागते अप्रतिम. मलबारी पराठा ही दक्षिणात्यांचीच, केरळची खासियत आहे. त्याला ते परोटा म्हणतात. अनेक पापुद्रे असलेला हा परोटा साधा असतो. त्यात सारण नसते. केरळ व तामीळनाडूच्या ग्रामीण भागांत छोटीशी दुकाने असतात. समोर दोन बाजूंना दोन बाकडी. त्यावर बसून लोक हा खातात. पराठय़ावर अंडा करी व आम्लेट. खाली केळीचे व कसले तरी मोठे पान. काही ठिकाणी कागदावरच पराठा मिळतो. मुंबईत फोर्ट, अंधेरी, गोरेगाव, सायन, धारावी, माटुंगा व चेंबूर अशा काही ठिकाणी केरळी रेस्टॉरंट आहेत. बहुतांशी मांसाहारी. मासे व बीफ, चिकन स्टिय़ू खाणारे बरेच. सर्व ठिकाणी शाकाहारींसाठी वेगळय़ा भांडय़ांत स्वयंपाक केला जातो. केरळचा परोटाही आता अनेक देशांत लोकप्रिय झालाय.
[email protected]






























































