>> शिरीष कणेकर
रवी शास्त्री हा गरिबांचा सोबर्स होता. (गरीब म्हणजे अगदी भिकारीपदाला पोहोचलेले गरीब!) त्याच्या फलंदाजीत व गोलंदाजीत दोन्हीत तसा दम नव्हता, पण दोन्ही मिळून तो आब व संघातील जागा राखून होता. फलंदाजीत दम नसताना सलामीला जाऊन धावा काढण्याची जिगर त्याच्यात होती. जिगर हाच त्याच्या खेळाचा व व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक होता. मर्यादित गुणवत्ता असलेला खेळाडू केवळ जिगरीच्या जोरावर अत्युच्चपदी कसा जाऊ शकतो याचं तो मूर्तिमंत उदाहरण होता. गुड, यार! सगळ्यांनाच देव किथ मिलर, आयन बोथॅम, विनू मंकड, इम्रान खान, जॅक कॅलिस, गारफिल्ड सोबर्स, मोहिंदर अमरनाथ, अँड्र्यु फ्लिंटाफ, शेन वॉटसन करीत नसतो. जास्त करून रवी शास्त्रीच जन्माला येतात. पण केवळ जिद्दीच्या जोरावर ते स्वतःत अद्भुत प्रगती करू शकतात व बड्या खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळू शकतात. रवी शास्त्री इज अ लिव्हिंग एक्झाम्पल!
रवी शास्त्री त्याच्या जमान्यात विलक्षण लोकप्रिय होता. लोकप्रिय म्हणजे टिंगल करायला, टोमणे मारायला, टर उडवायला, रेवडी उडवायला क्रिकेटप्रेमींना तो सर्वाधिक आवडायचा. ‘रवी शास्त्री हाय हाय’ ही घोषणा त्यांनी खास शास्त्रीसाठी तयार केली होती. तो फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण काही करीत असो, स्टेडियमवर गर्दी केलेली माणसं ‘रवी शास्त्री हाय हाय’ ही घोषणा एका सुरात देत. जास्त करून ब्रेबॉर्न स्टेडियमवरील ‘ईस्ट स्टँड’चा यात पुढाकार असे. पुढे पुढे तर शास्त्री मैदानावर नसला तरी ‘रवी शास्त्री हाय हाय’चा जयघोष चालू असायचा. या प्रकारानं कावलेल्या शास्त्रीनं एकदा बाहेर येऊन प्रेक्षकांना रागानं आवळलेली मूठ दाखवली होती. त्यानं ते जास्तच चेकाळले. त्यांनी ‘रवी स्त्री हाय हाय’चा जल्लोष केला. राष्ट्रगीतदेखील कधी इतक्या एकात्मतेनं गायलं नसेल. मोठ्या जनसमूहाला एकत्र आणण्याचं महान समाजवादी कार्य रवी शास्त्रानं केलं.
त्याच्या निवृत्तीबरोबर त्याच्याभोवती भुंग्यासारख्या फिरणाऱया त्या देशव्यापी, क्रांतिकारी, सर्वगामी घोषणेचा नैसर्गिक अंत झाला. कदाचित या टिंगलखोर प्रेक्षकांना शास्त्राची जागा घेणारा त्या तोलामोलाचा, त्या वकुबाचा, सामान्य कुवतीचा त्याच्यासारखा दुसरा अष्टपैलू खेळाडू गवसला नसावा. बिन्नी, आझाद, मदनलाल चालले नसते का? असो. ‘रवी शास्त्री हाय हाय’ या निषेधात्मक घोषणेसह तो क्रिकेटमधून बाहेर पडला.
त्यानंतर प्रशिक्षक म्हणून त्यानं केलेलं पुनरागमन कमालीचं यशस्वी ठरलं. संघ जेवढा यशस्वी तेवढा कर्णधार यशस्वी असे म्हणण्याची पद्धत आहे. त्याच न्यायानं प्रशिक्षकाचं यश संघाच्या यशाच्या मापात मापलं जातं. त्या हिशेबानं शास्त्री हा यशस्वी प्रशिक्षक म्हणून गणला जातो. प्रशिक्षक स्वतः मोठा खेळाडू असायलाच हवा असं नाही, असं जाणकारांकडून म्हटलं गेलंय. (जाणकार नसल्यानं असेल) मला या मताशी सहमत होणे कठीण जातंय. (द्रोणाचार्य आचरेकर व सचिन तेंडुलकर हे देदीप्यमान उदाहरण माझ्या तोंडावर मारले जाते.) स्वतःला न जमलेल्या गोष्टी कशा करायच्या हे अचूक हेरून त्या शिकवणे या प्रशिक्षकांना कसे जमते? विक्रम राठोड फलंदाज घडवितो, हे पचवणे कठीण नाही का? जाँटी ऱहोडस् क्षेत्ररक्षक घडवितो हे सहज कळू शकते, पण संदीप पाटील क्षेत्ररक्षक घडवितो म्हणाल तर ते कसं घशातून उतरेल हो? दीप दासगुप्ता यष्टिरक्षक घडवेल? साईराज बहुतुले अष्टपैलू खेळाडू घडविणार? हेमंत कानिटकर हार्वे, ग्रॅहॅम पोलॉक व ब्रायन लारा तयार करणार? उनाडकरच्या मुशीतून अलेक बेडसर, फाजल महमूद व हेडली तयार होणार का?
निवृत्तीनंतर रवी शास्त्री लगेच कॉमेंटेटर या त्याच्या प्रशिक्षकपूर्व पेशाकडे वळलेला नाही. प्रशिक्षकपदाची मुदत संपल्यामुळे, करार संपल्यामुळे तो बाहेर पडलाय. पुण्याईच्या बळावर मुदतवाढ मिळावी ही अपेक्षा भाबडी आहे. (ऑस्ट्रेलियातील पुण्याईच्या बळावर अजिंक्य रहाणेला मुदतवाढ दिलीच होती की. काय दिवे लावले त्यानं?) राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून समर्थ आहे हे पालुपद वापरून शास्त्री अधून मधून पचकण्याचं काम चोख बजावीत आहे. त्यावरून विराट कोहलीशी असलेली त्याची जवळीक कळली. (व त्याच्या यशस्वी कारकीर्दीची गोमही कळली.) असो. मध्यंतरी तो म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील एकही चेंडू मी पाहिला नाही.’
आँ? का बाबा? डोळ्यात सतत औषध घालून बसला होता? अरे, आम्ही एक चेंडू सोडला नाही आणि काल-परवापर्यंत देशाचा यशस्वी प्रशिक्षक म्हणून मिरविणारा तू एक चेंडू पाहिला नाहीस? पोटासाठी केलेली नोकरी संपल्यावर माणसानं ऑफिसच्या इमारतीकडे फिरकू नये असे तुझे वागणे नाही का? करारमुक्त झाल्याक्षणी तुझा देशाच्या क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला? साधं कुतूहलही मागे राहिलं नाही? काय करायचं माहित्येय का? हाफ-पँटीत उघड्यानं बसून पाय लांब करायचे, एक मोठी-थोरली जांभई द्यायची. तुझ्याकडे ‘टाटा स्काय’ असेल तर रिमोटने 455 नंबरचा चॅनेल लावायचा. लगेच (जाहिराती चालू नसतील तर) समोर सामना दिसेल. वाटेल तेवढे चेंडू फुकट बघता येतील…
येत्या 27 मे रोजी रवी शास्त्री साठ पूर्ण करेल. साठी बुद्धी नाठी व्हायला सुरुवात झालेली दिसते…





























































