‘लेणे प्राचीनत्त्वाचे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

नाशिक तीर्थक्षेत्राचा परिसर मंदिरे व लेणी यांकरिता प्रसिद्ध आहे. येथील पांडव लेणी, चामर लेणी तसेच विविध शिल्पमंदिरांचा समूह निर्जीव दगडांमध्ये चैतन्याचे शिंपण करणारा व अमूर्ताला देखणे मूर्तत्व बहाल करणारा आहे. नाशिक शहराच्या उत्तरेकडील जैन धर्मियांची चामर लेणी व दक्षिणेकडील बौद्ध स्वरूपी पांडव लेणी यांचा समूह या परमपावन शहराच्या प्राचीनत्त्वावर शिक्कामोर्तब करणारा आहे.

नािशिकनजीक म्हसरुळ गावापाशी असलेला चामर लेणी हा चार लेण्यांचा समूह म्हैसूरच्या चामराज राजाने पुनःस्थापित केला आणि वसविला. सन 900 मधील या घटनेमुळे या शिल्प समूहाचे नामांतर ‘चामर’ लेणी असे झाले, मात्र विस्मृतीच्या छायेमध्ये विसावलेली ही लेणी दोनएकशे वर्षांपूर्वी भट्टारक क्षेमेंद्रकीर्ती या साधू श्रेष्ठामुळे पुन्हा एकदा दृष्टोत्पत्तीस आली. म्हसरुळ गावानजीक डोंगरावर चामर लेणी असून डोंगर पायथ्याशी जैन मंदिर तसेच भारतीय वायू सेनेचे पेंद्र आणि वसाहत आहे. हा भाग मखमलाबाद नावाने ओळखला जातो.

सुमारे साडेचारशे पायऱ्यांमधून वळणावळणाने गेलेला नागमोडी रस्ता आपल्याला चामर लेण्यांपर्यंत पोहोचवतो. पहिली गुंफा साडेचार मीटर रुंद आणि सवा दोन मीटर खोल आहे. येथे भगवान पार्श्वनाथांची ध्यानावस्थेतील भव्य आसनस्थ मूर्ती पाहता क्षणीच आपले लक्ष वेधून घेते. मूर्तीच्या मस्तकावर दशमुखी नागाचा फडा सावली धरून असल्याचे पाहावयास मिळते. सिद्धासनावस्थेतील ही मूर्ती सवा दोन मीटर अर्थात जवळपास सात फूट इतकी भव्य आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला चार कमल पुष्पे कोरलेली आहेत. भगवान पार्श्वनाथांच्या चेहऱयावरील कमालीचे शांत, स्निग्ध आणि प्रेमळ भाव आपल्या हृदयातील सात्त्विकता जागृत करतात.

येथून पुढे दृष्टीस पडणाऱ्या दुसऱ्या गुंफेची एक बाजू मोकळी असून उर्वरित तीन बाजूस कातळी भिंतीत कोरलेले खांब दिसून येतात. डावीकडे एका देवतेची मूर्ती असून उजवीकडे दोन स्तंभांच्या मध्यभागी वाघावर स्वार झालेले मांडीवर मूल असलेले देवीचे रूप दिसते. गुंफेच्या दर्शनी बाजूस सिंह व नागमुखे असून, नागफण्यांच्या सावलीखाली असलेली पार्श्वनाथांची मूर्ती, सेवक गण, गौतम तसेच अनेक छोटय़ा-मोठय़ा आकारातील मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. फळांनी लगडलेले आंब्याचे झाड, प्राणीपक्षी, निसर्गातील प्रतीकात्मक कोरीव रेलचेल आपणांस येथे पाहावयास मिळते. या गुंफेमधील मुख्य मूर्तीची नित्य पूजा पुजारी वर्गाकडून केली जाते.

येथून पुढे अरुंद होत गेलेल्या मार्गावर पुन्हा काही गुंफा, कोरलेले दगडी स्तंभ, तीर्थंकरांच्या मूर्ती, सिंहासनावरील ध्यानस्थ मूर्ती, सेवक-सेविका, वृक्षवल्ली, प्राणीमात्र आदींची दाट व सुबक छाया या गुंफांच्या विविध दालनात अनुभवावयास मिळते. पाचमुखी फडय़ांनी सावली धरलेल्या नागराजासह पार्श्वनाथ भगवंताची आणखी एक उत्कट छबी आपल्याला या गुंफांमध्ये पाहावयास मिळते. उच्चासनावरील आदिनाथांचे शिल्प तसेच सभोवती खोदलेल्या 21 कोनाड्यातील तीर्थकरांच्या 21 कोरीव मूर्ती शिल्प स्वरूपात आहेत. 24 तीर्थंकर, सेवक गण, साधक व अनुयायी, अंबिका-विद्याधर, छत्र-चामरधारी सेवक येथे दगडी शिल्पातून साकारलेले आहेत. येथे सात बलभद्र व अनेक मुनी जन निर्वाण, प्रस्थान करते झाले. त्यातील एक गजकुमार या प्रमुख आचार्यांच्या स्मरणार्थ या चामर लेण्यांना ‘गजपंथ’ लेणी म्हणूनही ओळखले जाते. चामरलेणी चढता-उतरताना नाशिक परिसराचे वैभव व सौंदर्य अनुभवता येते. वणीची देवी अर्थात सप्तशृंगीच्या वास्तव्याने परमपावन झालेला सप्तश्रुंग गड आणि त्यासमोरील मार्कंडेय ऋषींचा गड, गुजरात सीमेवरील ‘सापुतारा’चा आल्हाददायक परिसर, खेड्यातील छोटी घरे आणि वसाहती आपले दूरवरून लक्ष वेधून घेतात.

म्हसरूळच्या चामर लेण्यांप्रमाणेच ‘पांडव लेणी’देखील नाशिक परिसराचे महत्त्व व माहात्म्य समृद्ध करण्यामध्ये अग्रेसर आहेत. या चामर लेण्यांसोबतच नाशिकची ओळख दृढ करणारा लेणी समूह ‘पांडव लेणी’ या नावाने ओळखला जातो. अंबड-सातपूर औद्योगिक क्षेत्र विभागाच्या पार्श्वबाजूस डोंगरावर असलेल्या पांडव लेण्यांमध्ये चोवीस गुंफा सलग कोरलेल्या असून देशातील प्राचीन कोरीव लेण्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त करून आहेत. शंखाकृती तीन डोंगर जे ‘त्रिराशी’ नावाने ओळखले जातात त्यावर ही लेणी खोदलेली आहेत. नाशिकपासून सात किमीवर आग्रा महामार्गावर वन खाते व महाराष्ट्र पर्यटन यांनी लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आखलेला आहे. गर्द वनराईतून पावलांगणिक पायथ्याशी असलेले नाशिकचे प्रेक्षणीय रूप नजरेत साठवून पांडव लेण्यांपर्यंत जाण्याची गंमत काही औरच आहे.

आकारमानानुसार वर-खाली असलेल्या सलग 24 गुंफांमध्ये प्रत्येक गुंफेला जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका आहेत. 1, 3, 10, 11, 16, 17, 18, 20, 24 ही दालने शिल्पकलेचे समृद्ध व थक्क करणारे कौशल्य दाखविणारे असून उर्वरित दालने मात्र अर्धवट काम केलेल्या स्वरूपातील, तुलनेने अधिक रिकामी, निर्मितीक्षम प्रकारातील असल्याचे आढळते. पहिल्या दालनातील भव्य परिसर, पुढील दालनामध्ये जातक कथांच्या अनुषंगाने असलेले प्रसंग, प्राणीमात्र, सेवक गण, राजे-महाराजे यांची कोरीव कलाकुसर केलेली दालने, प्रवेशद्वारांच्या चौकटीवर केलेले रेखीव काम, स्तूप, प्रचंड मोठे स्तंभ व त्यावरील नजाकतभरी कलाकुसर, विशाल चैत्यगृह, मिरवणूक दृश्ये, गजदळ-पायदळ, शिवपिंड, सतरा क्रमांकाच्या लेण्यातील भगवान बुद्धांची सतरा शिल्पे मन मोहवून टाकतात. भगवान बुद्धांच्या भावावस्था, सहजावस्था, शयनस्थ व आसनस्थ मुद्रा आणि प्रत्येक रूपामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आढळणारे शांत व स्निग्ध भाव आपल्या मनावर शांततेचे आवरण चढवितात, आपल्याला अंतःर्मुख करतात, मात्र हे सारे काही पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण या प्राचीन लेण्यांना भेट दिली पाहिजे आणि प्राचीन काळातील शिल्पकारांच्या कलेला दाद देण्याचा हा साधासोपा मार्ग आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

[email protected]